जिल्हाध्यक्षपदाचा वाद धनंजय मुंडेंच्या दरबारात

जिल्हाध्यक्षपदाचा वाद धनंजय मुंडेंच्या दरबारात

औरंगाबादः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देतांनाच आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी या पदासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव पुढे केल्याने वाद निर्माण झाला आहे. सतीश चव्हाण यांच्या नावाला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून प्रचंड विरोध होत असून या संदर्भात राष्ट्रवादीचे एक शिष्टमंडळ थेट परळीत जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय करणार नाही असा शब्द मिळाल्यावरच हे शिष्टमंडळ औरंगाबादेत परतले. 

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव होऊन त्यांच्या सदस्यांची संख्या दोनवरून एका आकड्यावर आली. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून वैजापूरचे आमदार व जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सोपवला होता. मात्र पराभवाची जबाबदारी सामूहिक आहे, तुमच्या एकट्याची नाही असे म्हणत तो फेटाळण्यात आला होता. काही महिन्यानंतर चिकटगांवकर यांनी "मतदारसंघ सांभाळतांना, जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्याला वेळ देणे 
शक्‍य होत नाही' असे सांगून पक्षाने आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे असे सांगत पुन्हा एकदा राजीनामा दिली. परंतू तो देतांनाच चिकटगांवकर यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी आमदार सतीश चव्हाण यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे परस्पर केली. 
चव्हाणांच्या नावाला विरोध 
जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी कुठलीही चर्चा न करता परस्पर सतीश चव्हाण यांचे नाव पुढे केल्याचा आरोप करत जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संपर्कप्रमुख म्हणून पक्षाने माजीमंत्री व सध्या राष्ट्रवादीतून निलंबित केलेले सुरेश धस यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या निलंबनानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी सोपवली 
आहे. त्यामुळे रविवारी (ता. 26) शहरातील राष्ट्रवादीचे एक शिष्टमंडळ परळीत मुंडे यांच्या भेटीसाठी गेले होते. या भेटीत सर्वांनीच जिल्हाध्यक्षपदी सतीश चव्हाण यांची नेमणूक करू नये अशी मागणी लावून धरली. मुंडे यांनी तुम्हाला विश्‍वासात घेतल्याशिवाय जिल्हाध्यक्ष ठरवणार नाही असा विश्‍वास दिल्यानंतरच शिष्टमंडळ माघारी फिरले. गेल्या काही महिन्यांपासून आमदार सतीश चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे, कदीर मौलाना यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सतीश चव्हाण यांच्यावर ते वरिष्ठांचे कान भरतात, त्यांच्यामुळे पक्ष बुडत असल्याचे गंभीर आरोप केले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com