Dhangar Reservation Report will be Submitted in next Session | Sarkarnama

पुढील अधिवेशनात धनगर आरक्षणाचा अहवाल : मुख्यमंत्री

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

धनगर आरक्षणाविषयी टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्सेसचा अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवाल केंद्राला पाठविणार आहे. धनगर आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. आदिवासींच्या आरक्षणाला हात न लावता धनगर समाजाला आरक्षण देणार आहोत - मुख्यमंत्री

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विधेयकास विधानसभेने मंजुरी दिल्यानंतर विधान परिषदेत धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला. 'आता धनगर समाजाने जल्लोष कधी करायचा', असा प्रश्‍न सभागृहात उपस्थित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणाचा प्रत्यक्ष कृती अहवाल पुढील अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले.

विधानपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'धनगर आरक्षणाविषयी टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्सेसचा अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवाल केंद्राला पाठविणार आहे. धनगर आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. आदिवासींच्या आरक्षणाला हात न लावता धनगर समाजाला आरक्षण देणार आहोत. सार्वजनिक व्यासपीठांवर बोलणे आणि सभागृहांमध्ये बोलणे, यात फरक असतो. सभागृहामध्ये काही संकेतांचे पालन करावे लागते. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाची तारीख जाहीर करता येऊ शकत नाही; पण हे आरक्षण लवकरात लवकर दिले जाईल.'' 

''ज्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र काम केले, त्याच पद्धतीने धनगर समाजाला आरक्षण देण्यापूर्वीही तुमच्याशी चर्चा केली जाईल'', असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख