Dhangar reservation politics | Sarkarnama

आरक्षणावरून धनगर नेते अडचणीत? 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 एप्रिल 2017

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामील करून घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दिल्याचे वृत्त धडकल्याने धनगर समाजाच्या नेत्यांची चांगलीच अडचण झाली आहे. मोदी यांनी तसे वक्तव्य दिलेले नसल्याचा दावा धनगर समाजाचे नेते व खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केला आहे. 

नागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामील करून घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दिल्याचे वृत्त धडकल्याने धनगर समाजाच्या नेत्यांची चांगलीच अडचण झाली आहे. मोदी यांनी तसे वक्तव्य दिलेले नसल्याचा दावा धनगर समाजाचे नेते व खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केला आहे. 

निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनामुळे महादेव जानकर, डॉ. विकास महात्मे सारखे नेते भाजपसोबत आले होते. केंद्र सरकारला आता तीन वर्षे होत आहे व राज्य सरकारला अडीच वर्षे झाली आहेत. तरीही धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामील करण्याच्या संदर्भात या दोन्ही सरकारने कोणतेही पावले उचलली नाहीत. यामुळे धनगर समाजात नाराजी व असंतोष पसरत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय टाटा समाजविज्ञान संस्थेवर (टीआयएसएस) सोपविला आहे. या संस्थेने अद्यापही अहवाल दिलेला नाही. हा अहवाल येत्या डिसेंबर महिन्यात मिळण्याची शक्‍यता आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर त्यावर राज्य सरकार विचार करेल. हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामील करून घेणे शक्‍य नसल्याचे वक्तव्य प्रसिद्ध झाले. यामुळे या समाजातील कार्यकर्त्यांना जबर धक्का बसला. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी मात्र मोदींनी तसे कोणतेही वक्तव्य केलेले नसल्याचे म्हटले आहे. मोदींच्या विधानाची चुकीची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये फिरत असल्याचा दावा खासदार डॉ. महात्मे यांनी केला आहे. या बातम्यांवर समाजबांधवांनी विश्‍वास ठेवू नये, अशी विनंती आता खासदार डॉ. महात्मे करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख