.....त्या पाच अंधांच्या हाती धनंजय मुंडेंनी 48 तासांच्या आत दिले लाख मोलाचे धनादेश

धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर अवघ्या 48 तासांत अंध कुटुंबांच्यामदतीची प्रक्रिया पार पडली. पालकमंत्री म्हणून अध्यक्ष असलेल्या धनंजय मुंडे यांनी मदतीच्या या प्रस्तावावर रात्री 1 वाजता सही केली
Dhananjay Munde Handed over Cheques to Blind Families
Dhananjay Munde Handed over Cheques to Blind Families

बीड : दोन दिवसांपूर्वी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आयुष्याची व्यथा कथन करणाऱ्या दोन कुटुंबातील पाच जणांना आयुष्यातील पहिले फलित रविवारी मिळाले. श्री. मुंडे यांच्या हस्ते पाच जणांच्या हाती  प्रत्येकी एक लाख रुपयांच्या शासकीय मदतीचे धनादेश देण्यात आले.

'सरकारनामा'ने शनिवारी  'धनंजय मुंडेंचा डोळसपणा दोन अंध कुटुंबांना जगण्याची दृष्टी देऊन गेला' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. दुसऱ्याच दिवशी रविवारी या अंधांच्या हाती लाख मोलाचे धनादेश पडले. तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील यादव क्षीरसागर, विठ्ठलबाई क्षीरसागर, सम्राट क्षीरसागर, राजाबाई साठे, मुरलीधर साठे हे दोन कुटुंबातील पाचही व्यक्ती अंध आहेत. कलेच्या माध्यमातून ते पोटाची खळगी भारतात. 

दोन दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी त्यांची पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत भेट झाली. मुंडे यांनी या कुटुंबियांची व्यथा ऐकून त्यांना शासकीय मदतीची घोषणा मुंडे यांनी केली होती. विशेष म्हणजे त्यांच्या मदतीचे प्रस्ताव देखील समाजकल्याण आधिकाऱ्यांनाच तयार करायला लावले. समाजकल्याण उपायुक्त डॉ. सचिन मडावी आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. एडके यांनी  दिव्यांग बीज भांडवल योजना व समाज कल्याण विभागाच्या शेष निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मदतीचे प्रस्ताव तयार केले.

शनिवारी रात्री एक वाजता सबंधितांना पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या 'अपंग कल्याण' निधीतून प्रत्येकी एक लक्ष रुपये मदतीच्या आदेशावर पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी स्वाक्षरी केली. तर त्याच परिवारातील सहावा सम्राट याला १८ वर्ष पूर्ण नसल्याने मदत निधी न देता त्याचा शिक्षण व पूरक खर्चसाठी शिष्यवृत्ती देण्याचेही घोषित केले आहे.  त्यानंतर रविवारी पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील पाहिले शासकीय मुख्य ध्वजारोहण केले आणि मदतीचे धनादेश या अंध व्यक्तींच्या हाती ठेवले. जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, समाज कल्याण उपायुक्त सचिन मडावी, समाज कल्याण अधिकारी श्री राजू येडके, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या  शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कायम उपेक्षा मिळालेल्या त्या पाचही जणांनी इतक्या तत्परतेने मिळालेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त करताना भावुक होऊन 'मुंडे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला श्री. नगद नारायण पावले!' अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com