Dhananjay Mahadik Spending Time with Family in Lock Down Period | Sarkarnama

माजी खासदार धनंजय महाडिक रमले किचनमध्ये

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांचाही एक फोटो व्हायरल झाला असून ते चक्क किचनमध्ये पत्नीला मदत करण्याच्या कामात गुंतल्याचे दिसत आहेत

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन केले आहे, मग घरात बसूनच अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींचे काम सुरू आहे. कोण नातवांसोबत, कोण मुलांसोबत खेळतानाचे तर काही जण वाचन करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. अशातच माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांचाही एक फोटो व्हायरल झाला असून ते चक्क किचनमध्ये पत्नीला मदत करण्याच्या कामात गुंतल्याचे दिसत आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार झालेले श्री. महाडिक हे 2019 साली पराभूत झाले. पण पराभूत झाल्यानंतरही त्यांनी लोकांची नाळ तुटू न देता या ना त्यानिमित्ताने सुरू असलेल्या संपर्क त्यांनी कायम ठेवला आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

घरात बसायचे मग करायचे काय असा मोठा प्रश्‍न सर्वसामान्यांबरोबरच आजी-माजी लोकप्रतिनिधींना सतावत आहे. त्यातून काहींनी मुले, नातवांसह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत कॅरम, बुध्दीबळ, पत्ते यासारखे खेळ खेळण्यात दंग आहेत. काहींनी पत्नीला सहकार्य म्हणून किचनचा ताबा घेतला आहे तर काहींनी पुस्तक वाचणे, गाणी ऐकण्यात आपला वेळ घालवला आहे. अशाच पध्दतीने माजी खासदार महाडिक हेही पत्नीला मदत करण्यासाठी किचनमध्ये नाष्ट्याची तयारी करताना फोटो दिसत आहेत. 

त्यांच्यासोबत पत्नी सौ. अरूंधती, मुलगा पृथ्वीराज, कृष्णराज हेही काही तरी मदत करताना दिसत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनीच हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला. माजी खासदारांचे एक वेगळे रूप या निमित्ताने पहायला मिळाल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. काहींनी आम्हालाही नाष्ट्याला बोलवा असा आग्रह धरला आहे. त्यातून या फोटाची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
 
  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख