dhananjay mahadik speech in gokul shirgaon | Sarkarnama

बरीच वर्षे घड्याळासोबत होतो त्यामुळे असे झाले...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

आज दिवसभर श्री. महाडिक यांच्या हा व्हिडीओच सर्वत्र व्हायरल झाला. नेटकऱ्यांनीही आपआपल्या परीने त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोल्हापूर :   राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अलिकडेच भाजपात प्रवेश केलेले माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या तोंडी अजूनही 'घड्याळ' च असल्याने त्यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत 'कमळ' ऐवजी 'घड्याळ' चिन्हासमोरील बटन दाबण्याचा उल्लेख अनावधानाने केल्याने एकच खळबळ उडाली. बरीच वर्षे मी घड्याळासोबत होतो, पण या मतदार संघात घड्याळच नाही असा खुलासा करून त्यांनी यावर पडदा टाकला.

श्री. महाडिक यांचे चुलत बंधू आमदार अमल महाडिक हे कोल्हापूर दक्षिण मतदार संघात भाजपाचे उमेदवार आहेत. बुधवारी (ता. 9) रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या प्रचारार्थ गोकुळ शिरगांव येथे माजी खासदार महाडिक यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होती. यात श्री. महाडिक यांनी विरोधकांवर जोरदार टिका करताना त्यांच्याकडून द्वेषाचे व दबावाचे राजकारण सुरू असले तरी लोक त्यांना स्विकारणार नाहीत. या राजकारणाला येत्या 21 तारखेला उत्तर देताना अमल महाडिक यांच्या नावांसमोरील घड्याळाचे बटन दाबा असे त्यांनी आव्हान करताच सभेला उपस्थित लोकही आवाक्‌ झाले.

झालेली चूक लक्षात येताच श्री. महाडिक यांनी माफी मागत श्री. महाडिक यांचे 'कमळ' चिन्ह असल्याचे सांगितले. मी बरीच वर्षे घड्याळासोबत होतो त्यामुळे असे झाले पण काय चिंता करायची गरज नाही इथे घड्याळ चिन्हच नाही असे सांगत दुसऱ्या क्षणी त्यांनी चूक दुरूस्त केली.

या सभेला माजी महापौर शिवाजीराव कदम, माजी सरपंच बाबुराव पाटील, एम. एस. पाटील, राजन पाटील आदि उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख