Dhananjay Mahadik Happy about BJP Government Formation | Sarkarnama

जनतेच्या मताचे आणि हिताचे सरकार आले : धनंजय महाडिक

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

धनंजय महाडिक आज पहिल्यांदाच भाजपच्या बिंदू चौक येथील कार्यालयात गेले. येथे त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. महाडिक यांच्या कार्यालयातही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. 

कोल्हापूर :  ''भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले. मात्र, निकालानंतर शिवसेनेने आपली भूमिका बदलली. त्यामुळे गेले महिनाभर सरकार स्थापनेचा गोंधळ राज्यात सुरू होता. मात्र आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन राज्याला स्थिर सरकार दिले. हे जनतेच्या मताचे आणि हिताचे सरकार आहे,'' असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर भाजपा कार्याकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात जल्लोष केला. यावेळी धनजंय महाडिक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

सकाळी 11 वाजता बिंदू चौकात सर्व कार्यकर्ते एकत्र आले. वाद्यांच्या गजरात त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या. गुलालाची उधळण केली. थोड्यावेळात याच ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक कार्यकर्त्यांसह आले. त्यानंतर पदयात्रेने कार्यकर्त्यांचा जथ्था छत्रपती शिवाजी चौकात आला. येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या 
प्रसंगी धनंजय महाडिक म्हणाले, "भाजप आणि शिवसेना निवडणुकीला एकत्रीत सामारे गेले. जनतेने दोघांनाही सत्तास्थापनेचा कौल दिला. मात्र शिवसेनेने जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करून कॉंग्रेस आघाडीशी चर्चा सुरू केली. गेले महिनाभर सत्ता स्थापनेचा घोळ महाराष्ट्रात सुरू होता. एकीकडे महापुरामूळे नुकसानीच्या गर्तेत गेलेला शेतकरी आणि दुसरीकडे सरकार स्थापन न होणे अशी विचित्र स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली होती. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यात स्थिर सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार म्हणजे जनतेच्या मताचे आणि हिताचे आहे.''

यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, "मी पुन्हा येईन असे देवेंद्र फडणवीस यांनी आत्मविश्‍वासाने सांगितले होते. आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन ते पुन्हा या पदी आले आहेत. शिवसेने आपली भूमिका बदलून जनतेचा विश्‍वासघात केला. पण भारतीय जनता पार्टी राज्याला स्थिर सरकार देईल. त्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल. 

जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले,"मुख्यमंत्री पदाच्या माहोत शिवसेना इतकी वहात गेली की त्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला. कॉंग्रेसच्या सांगण्यावरून महाशिवआघाडी मधील शिव शब्द ही वगळला. त्यांनी निवडणुकीतील कौल नाकारून जनतेचा अपमान केला. मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन स्थिर सरकार दिले आहे. आम्हीही जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन मजबूत करून पक्षाचा विस्तार करू.''

यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा फिरवून आणि महिलांनी फुगडी घालून आनंद साजरा केला. यावेळी नगरसेवक आशिष ढवळे, सत्यजीत कदम, विजय सूर्यवंशी, किरण नकाते, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, ऍड.संपत पवार, मारुती भागोजी, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, अमोल पालोजी, हेमंत अराध्ये, हर्षल कुंभोजकर, विवेक कुलकर्णी, सुरेश जरग, संतोष लाड, सुर्यकांत देसाई, गायत्री राऊत, सुलभा मुजूमदार, कविता पाटील, विद्या पाटील, असावरी चोपदार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाडिका पहिल्यांदाच पक्ष कार्यालयात
धनंजय महाडिक आज पहिल्यांदाच भाजपच्या बिंदू चौक येथील कार्यालयात गेले. येथे त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. महाडिक यांच्या कार्यालयातही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख