31 ऑगस्ट...धनंजय महाडिकांचा मुहुर्त ठरला!

भाजपाच्या महाजनादेश यात्रेची सांगता 31 ऑगष्टला सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
31 ऑगस्ट...धनंजय महाडिकांचा मुहुर्त ठरला!

कोल्हापूर : आज-उद्या करत लांबलेला माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेशाला अखेर मुहुर्त मिळाला आहे. 31 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्री. महाडिक यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबच भाजपा प्रवेश करणार असल्याचे समजते.  

दरम्यान, भाजपा प्रवेशाबाबत चर्चा करण्यासाठी श्री. महाडिक आज मुंबईला गेले आहेत. उद्या (ता. 27) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची प्राथमिक चर्चा होणार असून या चर्चेतच त्यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे. आपला प्रवेश हा पंतप्रधान मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 
लोकसभेत प्रचंड काम करूनही श्री. महाडिक यांचा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दारूण पराभव झाला. या निवडणुकीत दोन्हीही कॉंग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांनी मदत न केल्याचा आरोप त्यांचा आहे. त्यातूनच ते पक्षावर नाराज आहेत. मुळात लोकसभेलाही त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊ नये अशी त्यांच्या जवळचे मित्र व नातेवाईक यांची इच्छा होती. तथापि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील प्रेम व निष्ठेपोटी त्यांनी ही उमेदवारी स्विकारली होती. पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 

भाजपात पक्षीय पातळीवरील मोठी जबाबदारी देण्याच्या अटीवर त्यांचा प्रवेश निश्‍चित झाल्याचे समजते. पक्षात राज्य पातळीवरील त्यांना मोठे पद देण्याचा शब्द पालकमंत्री पाटील यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी कुटंबासह भाजपात प्रवेश करण्याबरोबरच युवाशक्तीचे अस्तित्त्वही विसर्जित करण्याची अट घालण्यात आल्याचे समजते. उद्या (ता. 27) पालकमंत्री पाटील यांच्याशी होणाऱ्या भेटीत यावर अधिकृत्त शिक्कामोर्तब होईल. 

भाजपाच्या महाजनादेश यात्रेची सांगता 31 ऑगस्टला सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्रीही उपस्थित रहाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात श्री. महाडिक यांचा कारखाना आहे, यानिमित्ताने त्यांचे कार्यक्षेत्रही या जिल्ह्यात येते, त्यामुळेच सोलापुरात भाजपा प्रवेश करण्याची तयारी श्री. महाडिक यांच्याकडून सुरू असल्याचे बोलले जाते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com