भानगावचे धनंजय कुलकर्णी `इंटरपोल`मध्ये : ठरले राष्ट्रपती पदकाचे मानकरी

....
dhanjay-kulkarni-
dhanjay-kulkarni-

नगर : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या देशभरातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. त्यात नगर जिल्ह्यातील भानगाव (ता. श्रीगोंदे) येथील धनंजय कुलकर्णी यांचाही समावेश आहे. मुंबईचे पोलिस उपायुक्त असलेले कुलकर्णी सध्या सिंगापूर येथे "इंटरपोल'च्या दहशतवादविरोधी विभागाचे समन्वयक म्हणून प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन उच्च पदावर गेल्यानंतर गुणवत्तापूर्ण कामगिरीचे दर्शन घडवत भारत देशाच्याच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या शांततेसाठी योगदान देणाऱ्या या अधिकाऱ्यामुळे नगर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे..!

श्रीगोंदे तालुक्‍यातील भानगाव येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले धनंजय कुलकर्णी यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण भानगाव आणि श्रीगोंदे येथे झाले. थोड्याशा कोरडवाहू शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह असतानाही कुलकर्णी जिद्दीने कृषी पदवीधर झाले. नंतर "एमपीएससी'ची परीक्षा उत्तीर्ण होऊन 1998मध्ये त्यांनी उपअधीक्षक म्हणून पोलिस खात्यातील सेवेस प्रारंभ केला. जळगाव येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. नंतर नागपूरच्या जंगल वॉरफेअर ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख आणि विशेष कृती दलाचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यामुळे त्यांच्याकडे बृहन्मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली. तेथील यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांनी मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणूनही काम केले. त्यांच्या कामाची पद्धत आणि झोकून देण्याची वृत्ती, गुन्ह्यांचा अभ्यास यामुळे त्यांच्यावर मुंबई पोलिस आयुक्तांचे अधिकृत प्रवक्ते म्हणून जबाबदारी देण्यात आली. ऑगस्ट 2014 पासून मे 2016 पर्यंत ते मुंबई पोलिस आयुक्तांचे प्रवक्ते आणि जनसंपर्क अधिकारी होते.


मुंबईतील गुन्ह्यांच्या अभ्यासामुळे आणि धडाडीमुळे जून 2016पासून कुलकर्णी यांच्याकडे दहशतवादविरोधी पथकाचे उपायुक्तपद देण्यात आले. या पदावरही त्यांनी उल्लेखनीय काम केल्याने त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे 2017मध्ये संपूर्ण वर्षभर ते हैती या देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे तेथील कामगिरीच्या जोरावरच त्यांना गेल्या वर्षी "इंटरपोल'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. त्यांच्याकडे "इंटरपोल'मध्ये दहशतवाद विभागाच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या ते सिंगापूर येथे कार्यरत असून, 2022 पर्यंत या पदावर राहणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्र पोलिस दलात दाखल होणार आहेत.
महाराष्ट्रात नक्षलवाद फोफावलेल्या भागात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल कुलकर्णी यांना विशेष सेवा पदक मिळाले आहे. शिवाय संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेतील कार्याबद्दल "युनो'ने शांतता पदकाने त्यांचा गौरव केला होता. "पोलिसशास्त्र' या विषयावरील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या या एकूण कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करतानाही भारताची मान कायम उंच ठेवण्यासाठी झोकून देऊन काम करण्याची वृत्ती अंगी बाणवल्याचे धनंजय कुलकर्णी अभिमानाने सांगतात. "सरकारनामा'शी बोलताना ते म्हणाले, की महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस दलात विविध पदांवर काम करताना मिळालेल्या अनुभवाचा "इंटरपोल'मध्ये काम करताना खूप फायदा होतो. आता "इंटरपोल'मधून परतल्यानंतर तेथील अनुभवाचा फायदा मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस दलात काम करतानाही होणार आहे. "इंटरपोल'मध्ये दहशतवादविरोधी काम करताना होणाऱ्या अभ्यासाचा माझ्या भारत देशासाठी उपयोग व्हावा, अशीच माझी इच्छा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com