कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, आता धनंजय मुंडे झेडपी ताब्यात घेणार का ? 

राष्ट्रवादीपेक्षा कमी जागा येऊनही पंकजा मुंडे यांनी धस, मेटे, शिवसेना व काँग्रेसला सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता मिळविली होती. अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने आता नव्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत.
munde-vs-munde
munde-vs-munde

बीड : जिल्हा परिषदेच्या सत्तेची समिकरणे बहुतेक वेळा राज्याच्या राजकारणावर अवलंबून असतात. निवडणुकीत कमी जागा मिळूनही मंत्रीपद आणि सत्तेच्या बळावर पंकजा मुंडेंनी टाकलेले डावपेच यशस्वी झाले आणि जिल्हा परिषद सत्तेपासून राष्ट्रवादी दुर फेकली गेली होती.

आता राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असून धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे मागच्या प्रमाणे सत्तेचे गणित जुळविण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरणार का हे पहावे लागणार आहे. पाच दिवसांनी जिल्हा परिषदेचे नवे पदाधिकारी निवडले जाणार आहेत.


पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत होते. पंकजा मुंडे स्वत: पालकमंत्री, त्यांच्यासह जिल्ह्यात पाच आमदार, केंद्रात सत्ता आणि भगीनी खासदार अशी भाजपची ताकद असताना निवडणुकीत मात्र भाजपला राष्ट्रवादीपेक्षा सात जागा कमी मिळाल्या होत्या. परंतु, सत्तेच्या बळावर पंकजा मुंडेंनी खेळलेले डावपेच यशस्वी झाले. 


त्यावेळी त्यांचे आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे राजकीय वितुष्ट असतानाही त्यांनी मेटेंच्या चार सदस्यांची साथ मिळविली तर त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या सुरेश धस यांच्या पाच सदस्यांची साथ मिळविली. शिवसेनेचे चार आणि काँग्रेस एक अशी सदस्य संख्या जुळवत त्यांनी जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली होती. एकूणच राज्यातली सत्ता आणि मंत्रीपद या दोन जमेच्या बाजूंमुळे त्यांनी राष्ट्रवादीचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळविले होते.


आता पारडे राष्ट्रवादीच्या बाजूने आहे. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी असून धनंजय मुंडे यांनाही कॅबीनेट मंत्रीपद मिळाले आहे. जिल्ह्यात त्यांच्यासह राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. विशेष म्हणजे भाजपला मतदान करणाऱ्या सुरेश धस गटाच्या चार सदस्यांना आजघडीला मताचा अधिकार नाही. या सर्व राष्ट्रवादीसाठी जमेच्या बाजू आहेत. पाच दिवसांनी जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत.


ज्या जमेच्या बाजूने भाजपने सत्ता मिळविली होती त्या आता राष्ट्रवादीकडे आहेत. आता धनंजय मुंडे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविणार का, हे पहावे लागणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com