`हल्लाबोल`मुळे मुख्यमंत्र्यांची झोप उडाली : धनंजय मुंडे

`हल्लाबोल`मुळे मुख्यमंत्र्यांची झोप उडाली : धनंजय मुंडे

शिरूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हल्लाबोल आंदोलन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त दोन - तीनच तास झोपायचे; पण आता या आंदोलनाचा पुणे जिल्ह्यातील माहोल पाहून या बाबाची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या शासनकर्त्यांना जागे करण्यासाठीच आम्ही राज्यभर हल्लाबोल करीत आहोत, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे सांगितले. 

राष्ट्रवादीची ही राज्यव्यापी हल्लाबोल यात्रा भाजप - शिवसेना सरकारची अंत्ययात्रा काढूनच थांबेल, असे नमूद करून मुंडे म्हणाले, "भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करून लोकसभेची निवडणूक लढविली. देशासमोर गुजरातचे मॉडेल ठेवून 125 कोटी जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. त्यावेळी लहान मुलेदेखील म्हणायचे अच्छे दिन आनेवाले है. पण आता "अच्छे दिन' ची चेष्टा घराघरात होऊ लागली आहे.''

परिवर्तनाच्या या निर्णायक लढाईत भाजप - शिवसेनेला नेस्तनाबूत केल्याशिवाय, त्यांना सत्तेतून बाहेर काढून राज्य सरकार उलथवून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 

अजितदादांना मुख्यमंत्री करायचे असेल; तर केवळ इथे बसून, सभेला येऊन, भाषणे ऐकून ते साध्य होणार नाही. त्यासाठी गल्लोगल्ली जा, घराघरांत जाऊन प्रत्येक माणसाला "राष्ट्रवादी' विचार पटवून सांगा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

वाय फाय आणि डिजिटल इंडिया ने पोट भरणार नाही. कष्ट करून, घाम गाळून अन्न उत्पादन करणाऱ्या शेतकरी समाजाला प्रतिष्ठा मिळण्यातून आणि त्याच्या जीवनात समृद्धी आल्याशिवाय हे साध्य होणार नाही, असेही त्या म्हणाल्या. 2019 च्या निवडणुकीत परिवर्तन घडवायचे असेल; तर त्याची सुरवात शिरूर लोकसभा व विधानसभा मतदारसंघातून करण्याचा निर्धार करा. उमेदवार पाहू नका, पक्षसंघटनेला महत्त्व द्या आणि या मतदार संघात आम्हाला गुलाल खेळायला बोलवा, असे आवाहनही त्यांनी केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com