DySP Sameersinh Salave to get DG medal for gallantry service | Sarkarnama

नक्षल्यांविरोधात जोरदार कारवाई केलेले DySP समीरसिंह साळवे महासंचालक पदाने सम्नानित

संतोष शेंडकर
शनिवार, 2 मे 2020

गडचिरोली येथे रुजू झाल्यावर 2017 ते 2019 या कालावधीत त्यांनी नक्षलवादी विरोधी अभियानात प्रभावी कामगिरी बजावली. 2019 मध्ये छत्तीसगडच्या सीमेवर अबुजमाड जंगलात नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला होता. तब्बल 40 ते 50 नक्षलवाद्यांचा हल्ला साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोडून काढला.

सोमेश्वरनगर : बारामतीचे सुपुत्र समीरसिंह द्वारकोजीराव साळवे यांना पोलिस महासंचालक पद घोषित झाले आहे. 2018-19 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवत नक्षलवाद्यांचा संपूर्ण तळ उद्ध्वस्त करण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकापाठोपाठ आता महासंचालक पदही मिळणार असून दुहेरी मुकुट मिळवणारे ते तालुक्यातील पहिलेच अधिकारी आहेत. अवघ्या 29 व्या वर्षी हे खणखणीत यश मिळाले आहे.

समीरसिंह साळवे हे वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील असून त्यांचे वडील द्वारकोजीराव बाजीराव साळवे हे बँक ऑफ बडोदाच्या सोमेश्‍वरनगर शाखेतील निवृत्त अधिकारी आहेत. समीरसिंह यांनी लोणंदमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. फर्ग्युसन महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच 2014 मध्ये कांम्प्युटर इंजिनियरिंग पूर्ण केले. त्यानंतर पॅकेजमागे न धावता सरकारी सेवेत जाऊन लोकाभिमुख काम करण्यासाठी 2015 मध्ये राज्यसेवेची परीक्षा दिली. पहिल्याच परीक्षेत यश मिळवले आणि पोलीस उपाधीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. सोलापुरात त्यांच्या सेवेत सुरवात झाली आणि गडचिरोलीतील नियुक्ती त्यांनी मागून घेतली होती.

गडचिरोली येथे रुजू झाल्यावर 2017 ते 2019 या कालावधीत त्यांनी नक्षलवादी विरोधी अभियानात प्रभावी कामगिरी बजावली. 2019 मध्ये छत्तीसगडच्या सीमेवर अबुजमाड जंगलात नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला होता. तब्बल 40 ते 50 नक्षलवाद्यांचा हल्ला साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोडून काढला. काही नक्षलवाद्यांचा यामध्ये एन्काऊंटरही करण्यात आला तर नक्षलवाद्यांचा अबुजमाड येथील संपूर्ण तळ उद्ध्वस्त करण्याचा अतुलनीय पराक्रम समीरसिंह व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. याबद्दल त्यांच्यासह चार जणांना प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती शौर्य पदक प्रदान करण्यात आले होते. याच कामगिरीबद्दल त्यांना आता राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी पोलीस महासंचालक पद घोषित केले आहे. एकापाठोपाठ ही महत्त्वाची दोन्ही मिळवणारे ते तालुक्‍यातील पहिलेच अधिकारी आहेत. सध्या ते नाशिक जिल्ह्यातील मनमाड तालुक्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी गुन्हेगारांवर आपला वचक बसवला आहे. सोलापूर येथेही गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा तयार केली होती. तालुक्यात या सुपुत्राचे कौतुक होत आहे.

याबाबत द्वारकोजीराव व अलका साळवे अत्यंत आनंद व्यक्त करत म्हणाले, अवघ्या चार-पाच वर्षात समीरने शौर्य दाखवत अत्यंत मानाची दोन पदके पटकावली आहेत. वयाच्या 29 व्या वर्षी हे भाग्य त्याला मिळाले ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख