कोरोनाची भिती असलेल्यांनी सभेतून निघून जावे : देवयानी डोणगावकरांचा थयथयाट

devyani dongaokar
devyani dongaokar

औरंगाबादः दुसऱ्यांदा जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची संधी नशीबाने हिरावून घेतल्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष . देवयानी डोणगांवकर यांनी आज झालेल्या सर्वसाधारण सभेत चांगलाच थयथयाट केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभा थोडक्यात आटपावी असा आग्रह काही सदस्यांनी सभागृहात केला तेव्हा भडकलेल्या डोणगांवकर यांनी ज्यांना कोरोनाची भिती वाटत असेल त्यांनी सभागृहातून निघून जावे, मग सभा ठेवलीच कशाला? असा त्रागा केला. दुसऱ्यांदा हातातोंडाशी आलेला अध्यक्षपदाचा घास ईश्वर चिठ्ठीने गमावल्यामुळेच डोणगांवकर यांनी सर्वसाधारण सभेत अरेरावी केल्याची चर्चा सदस्यामध्ये सभेनंतर रंगली होती.

कोरोनाच्या सावटाखाली झालेली जिल्हा परिषदेची आजची सर्वसाधारण सभा गाजली खरी, पण ती वेगळ्याच कारणाने. अगदी दहा ते पंधरा मिनिटात सभेचे कामकाज आटोपण्याचा प्रशासन आणि सदस्यांचा प्रयत्न होता. पण सभेत मला बोलायचे आहे असा आग्रह धरत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. देवयानी डोणगावकर यांनी अक्षरश सभागृहाला वेठीस धरले. वारंवार विनंती करून, कोरोनाचे कारण देत आपले म्हणणे थोडक्यात मांडा अशी सदस्य आणि अधिकाऱ्यांनी केलेली विनंती देखील डोणगांवकर यांनी धुडकावून लावली.

सभा सुरू झाल्यानंतर मला इतिवृत्तावर बोलायचे आहे, असे म्हणत देवयानी डोणगांवकर बोलण्यासाठी उभ्या राहिल्या. मी अध्यक्ष असतांना जलसंधारण सभापती या नात्याने सिंचन विभागाची देणी देण्यासाठी ७ ते ८ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव दिला होता, त्याचे काय झाले? अर्थसंकल्पात तरतूद का केली नाही, याला जबादार कोण असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा लेखा व वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी मॅडम आम्ही सगळ्या विभागाच्या मागण्या एकत्रित करून त्याचा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी ठेवतो असे उत्तर दिले, मात्र डोणगावकर यांचे समाधान झाले नाही, खुलासा करा अशी मागणी त्यांनी लावून धरली.

जुना विषय उकरून काढला

त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वेळी १० ते १२ वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करायला वेळ का दिला नाही, याचे उत्तर द्या असे म्हणत आपला मोर्चा उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वळवला. आधीच १० ते १५ मिनिटात सभा संपवण्याचा प्रयत्न असतांना ती लांबल्यामुळे सगळे सदस्य, अधिकारी वैतागले होते. डोणगांवकर यांना मॅडम सांगतो ना असे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळताच त्यांचा पारा अधिकच वाढला. आवाज चढवून बोलू नका, मलाही आवाज वाढवता येतो असा दमच डोणगांवकर यांनी भरल्यामुळे सभेतील वातावरण चांगलेच तापले.

अनेक सदस्य वारंवार मॅडम कोरोनामुळे सभा आपल्याला लवकर संपवायची आहे अशी आठवण करून देत होते. त्यांनाही डोणगांवकरांनी चांगलेच सुनावले. कोरोनाची भिती ज्यांना वाटत असेल त्यांनी सभागृहातून निघून जावे, एवढीच भिती होती तर सभा ठेवलीच कशाला असे उपदेशाचे डोसच त्यांनी सगळ्यांना पाजले. कशीबशी सभा आटोपली तर सभागृहात आपली साथ न देणाऱ्या भाजपच्या सदस्यांना सुनावण्याची संधी देखील डोणगावंकर यांनी सोडली नाही. एकंदरित देवयानी डोणगांवकर यांचे आजचे सभागृहातील वर्तन हे त्यांना शोभणारे नव्हेत असा सूर सदस्यांमधून उमटत होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com