devsthan comitee | Sarkarnama

आता महालक्ष्मी कोणाला पावणार ? 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 11 एप्रिल 2017

गेल्या तीन वर्षापासून रिक्त असलेल्या पुणे गृहनिर्माण व नागरी विकास क्षेत्राच्या (म्हाडा) अध्यक्षपदी समरजतिसिंह घाटगे यांची नियुक्ती झाल्यानंतर
आता गेल्या पाच वर्षापासून रिक्त असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कोल्हापूर : गेल्या तीन वर्षापासून रिक्त असलेल्या पुणे गृहनिर्माण व नागरी विकास क्षेत्राच्या (म्हाडा) अध्यक्षपदी समरजतिसिंह घाटगे यांची नियुक्ती झाल्यानंतर आता गेल्या पाच वर्षापासून रिक्त असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पदासाठी जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. 

कोल्हापूरसह सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या देवस्थान समितीचे अध्यक्षपद 2012 पासून रिक्त आहे. या पदाबरोबरच समितीचे खजिनदारपदही रिक्त आहे. 2012 पर्यंत या पदावर ऍड. गुलाबराव घोरपडे कार्यरत होते, तर खजिनदार म्हणून बाळासाहेब कुपेकर होते. गेल्या पाच वर्षापासून या पदावर नियुक्तीच झालेली. राज्यात भाजप आघाडीचे सरकार आल्यानंतर अनेकांची नांवे या पदासाठी चर्चेत होती, प्रत्यक्षात कोणाचीही वर्णी लागलेली नाही. 

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर "शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना पुणे म्हाडाचे अध्यक्ष पद देण्याचा शब्द पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला होता. कालच पालकमंत्री पाटील यांनी हा शब्द खरा करून दाखवत जोतिबा यात्रेदिवशीच श्री. घाटगे यांना जोतिबा प्रसन्न झाला. आता महालक्ष्मी कोणाला पावणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. 

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत व्ही. बी. यांनी आपल्या स्नुषा सौ. रसिका पाटील यांचे मतदान भाजप आघाडीकडे दिले. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेस व पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेली जवळीक बाजूला ठेवून त्यांनी ही तडजोड स्वीकारली. यावेळी त्यांना देवस्थान समितीच्या अध्यक्ष पदाचा "शब्द' पालकमंत्री पाटील यांना दिल्याचे कळते. त्यामुळेच व्ही. बी. यांच्या नावाची जोरदार चर्चा या पदासाठी आहे. अध्यक्ष पदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रताच आवश्‍यक आहे अशी कोणतीही अट नाही. त्यामुळे व्ही. बी. यांनीही पदासाठी जोर लावल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत ही निवड होण्याची शक्‍यता असून त्यादृष्टीने हालचाली सुरू
झाल्या आहेत. 

दृष्टिक्षेपात देवस्थान समिती 
कार्यक्षेत्र - कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग 
एकूण देवस्थाने - 3066 
देवस्थानची जमीन - 10, 492 हेक्‍टर 
वार्षिक उत्पन्न - अंदाजे 12 ते 15 कोटी रुपये 
संचालक मंडळाचे स्वरूप - एक अध्यक्ष, एक खजिनदार व पाच सदस्य 
सचिव - महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख