मराठवाड्यातील गावागावांपर्यंत पाणी पोहोचविणार - देवेंद्र फडणवीस

 मराठवाड्यातील गावागावांपर्यंत पाणी पोहोचविणार - देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद : स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, कारावास व त्यांनी सहन केलेल्या अनन्वित अत्याचारातून मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. आपल्याला यापुढे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करावयाचे आहे. त्यासाठी शासनाने मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्त्वकांक्षी योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावागावांपर्यंत पाणी पोहचविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानंतर जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेशात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सदस्य सचिव विष्णूपंत धाबेकर, आमदार अंबादास दानवे, प्रशांत बंब, भाऊसाहेब चिकटगावकर, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त निपुण विनायक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि नुकतेच जम्मू काश्‍मीरमधील हटविलेले 370 कलम यातून स्वातंत्र्याची अनुभूती येते. मराठवाड्याच्या विकासाला अधिक चालना देण्याचे काम मागील पाच वर्षांपासून शासन करत आहे. सिंचन, रस्ते, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. आता शासनाने मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी संकल्प केलेला आहे. दुष्काळमुक्तीसाठी मराठवाड्यातील धरणे लूप पद्धतीने जोडून 64 हजार किलो मीटरच्या पाईपलाईनच्या माध्यमातून प्रत्येक गावात पाणी पोहचविणार असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले. तसेच या कामाला सुरूवात झाली आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. अजून चार जिल्ह्यांच्या निविदा प्रक्रिया लवकरच पूर्णत्वास येतील व वॉटर ग्रीड प्रकल्प पूर्ण होईल, अशी अपेक्षाही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने एक हजार 650 कोटी रुपयांच्या योजनेला नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे आगामी 50 वर्षात औरंगाबादला पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसवणार नसल्याचेही ते म्हणाले. मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी कोकणातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले. 

दुष्काळमुक्तीबरोबरच मराठवाड्यात उद्योग येऊन मराठवाड्याचा विकासाला अधिक चालना देण्यासाठी नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते डीएमआयसी टप्पा एकचे लोकार्पण करण्यात आले आहे. यातून मराठवाड्यातील औरंगाबाद-जालना उद्योगाचे मॅग्नेट आगामी काळात तयार होईल. त्यातून मराठवाड्यातील तरुणांच्या हाताला काम मिळेल, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. आगामी काळात मराठवाडा विकासाच्या दिशेने गतीने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करत मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना श्री. फडणवीस यांनी अभिवादन केले. तसेच जनतेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

सुरूवातीला स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून श्री. फडणवीस व मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलिस दलाकडून बॅंड, बिगूल वाजवून व तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर श्री. फडणवीस यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्री. फडणवीस यांनी स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे नातेवाईक यांची भेट घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com