Devendra Phadnavis will decide fate of civic amenities | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक निर्णयावर कंडोनिअमच्या कामाचे भवितव्य अवलंबून!

संदीप खांडगेपाटील
गुरुवार, 20 एप्रिल 2017

कंडोनिअमच्या मोफत कामाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसला जात असल्याचे प्रशासनात अधिक काळ सेवा करून विरोधी पक्षाच्या व्यासपिठावरून राजकारणात उतरलेल्या घटकांनी या कामामध्ये ‘खो’ घालण्याचा नियोजनबध्द प्रयत्न सुरू केला. सिडको सोसायट्या या सिडको मालकीच्या असल्याने त्यावर महापालिकेने खर्च करणे योग्य नसल्याचे प्रशासनाच्या गळी उतरवत कंडोनिअमच्या कामावर मर्यादा आणली.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात  ऐरोली ते बेलापुरदरम्यान विखुरलेल्या सिडको सोसायटी आवारात कंडोनिअम अंर्तगत होणार्‍या विकास कामांना गेल्या दोन वर्षापासून खिळ बसलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी व राजकीय पक्षसंघटनांनी सिडको सोसायट्यांमध्ये कंडोनिअम अंर्तगत विकास कामे सुरू व्हावीत यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात पाठपुरावा सुरू केला असून मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादावरच आता कंडोनिअमच्या कामाचे भवितव्य अवलंबून आहे.

कंडोनिअमअंर्तगत सिडको सोसायटी आवारात झालेल्या विकासकामांमुळे सिडको सदनिकाधारकांची सोसायटी आवारातील अनेक महत्वाची  कामे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने विनामूल्य करून दिलेली आहे. सुरूवातीच्या काळात सिडको सोसायटीअंर्तगत विकासकामे मोफत करण्यास महापालिका प्रशासनाची नकारघंटा सिडको सदनिकाधारकांना अनुभवयास मिळत होती. काही सिडको सोसायट्यांमध्ये पालिका प्रशासनाने सशुल्क स्वरूपात कंडोनिअम अंर्तगत कामे करून दिली. तथापि सिडको सदनिकाधारकांकडून महापालिका प्रशासन मालमत्ता कर घेत असल्याने कंडोनिअम अंर्तगत सिडको सोसायट्यांमध्ये महापालिका प्रशासनाने मोफतच नागरी कामे केली पाहिजेत, यासाठी महापालिकेच्या दुसर्‍या सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी गोंधळ घालत या मागणीचा प्रशासनाकडे पाठपुरावाही केला होता.

महापालिकेच्या तिसर्‍या सभागृहात महासभेदरम्यान सर्वपक्षीय नगरसेवकांनी ‘सिडको सोसायट्यांमध्ये महापालिका प्रशासनाने कंडोनिअमअंर्तगत नागरी कामे मोफत स्वरूपात करावीत’ असा ठराव मंजूर करून तो मंत्रालयामध्ये मंजूरीसाठी पाठविला. तत्कालीन स्थायी समिती सभापती व ऐरोलीचे विद्यमान आमदार संदीप नाईक यांनी मंत्रालयात हेलपाटे मारून त्या ठरावाला मंत्रालयीन पातळीवर मंजूरीही मिळविली.  मंत्रालयातून मंजूरी मिळाल्यावर सिडको सदनिकाधारकांना दिलासा मिळाला.

सिडको इमारती या जुनाट झाल्याने तेथील मल:निस्सारण वाहिन्या व जलवाहिन्यांची दुरावस्था  झाली होती. सिडको सोसायट्यांमध्ये राहणारे सदनिकाधारक आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गात मोडत असल्याने त्या वाहिन्या बदली करण्याचा खर्च त्यांच्या कुवतीबाहेरील होता. कंडोनिअम अंर्तगत सर्वप्रथम सिडको सोसायट्यांमधील मल:निस्सारण व जलवाहिन्या पालिका प्रशासनाने मोफत बदली करून घेतल्या. त्यानंतर महापालिकेच्या चौथ्या सभागृहात सिडको सोसायट्यांमध्ये व्यापक प्रमाणावर तळाशी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. ऐरोली ते बेलापुरदरम्यान टप्याटप्याने हे कंडोनिअमअंर्तगत सिडको वसाहतीमध्ये विकासकामे सुरू होती.

कंडोनिअमच्या मोफत कामाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसला जात असल्याचे प्रशासनात अधिक काळ सेवा करून विरोधी पक्षाच्या व्यासपिठावरून राजकारणात उतरलेल्या घटकांनी या कामामध्ये ‘खो’ घालण्याचा नियोजनबध्द प्रयत्न सुरू केला. सिडको सोसायट्या या सिडको मालकीच्या असल्याने त्यावर महापालिकेने खर्च करणे योग्य नसल्याचे प्रशासनाच्या गळी उतरवत कंडोनिअमच्या कामावर मर्यादा आणली. कंडोनिअमची कामे होत नसल्याने ठिकठिकाणच्या सोसायट्यांमध्ये विकासाबाबत दुजाभावाचे चित्र निर्माण झाले. एकाच प्रभागात काही सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉक तर काही सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉकच नाहीत. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची कोंडी झाली. ज्या सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसले नाहीत त्यांना काय उत्तर द्यायचे, या चिंतेमुळे अनेक नगरसेवकांनी स्वखर्चाने महापालिका निवडणूकीअगोदर उर्वरित सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवून टाकले.

महापालिकेच्या पाचव्या सभागृहात कंडोनिअमअंर्तगत विकासकामे झालेली नसल्याने गेल्या काही दिवसापासून काही नगरसेवकांनी, राजकीय पदाधिकार्‍यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनातून पुन्हा एकवार कंडोनिअम अंतर्गत महापालिकेने मोफत कामे करावी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, यावरच सिडकोच्या उर्वरित सोसायट्यांच्या कंडोनिअम अंर्तगत कामाचे भवितव्य अवलंबून आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख