Devendra Phadnavis hints ministerial berth for Rahul kul | Sarkarnama

राहुल कुल यांना भविष्यात मंत्री करण्याचे फडणवीसांचे संकेत

सरकारनामा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

..

वरवंड/केडगाव : बारामतीच्या अधिपत्याखाली दौंड तालुक्यात जी कामे होऊ शकली नाही. ती भाजप सरकारच्या माध्यमातून करण्यात आमदार राहुल कुल यांना यश आले.

मुळशी धरणाचे पाण्याबाबत ते फार आग्रही आहेत. याबाबत सकारात्मक निर्णय होईल. राहुल कुल यांचे कार्य पाहता आगामी काळात त्यांना मागण्याची नाही तर देण्याची जबाबदारी देण्यात येईल, असे फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरवंड ( ता.दौंड ) येथे  भाषणात  नमूद करताच मोठा जल्लोष झाला. 

 या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी राहुल कुल यांना भविष्यात मंत्रिपद देण्याचे संकेत दिले आहेत . 

मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दौंड तालुक्यतातून जात असताना त्यांनी वरवंड येथे जाहिर सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आमदार राहुल कुल, वासुदेव काळे, नामदेव ताकवणे, तानाजी दिवेकर, नगराध्यक्षा शीतल कटारिया, रासपचे दादा केसकर व हरिश खोमणे, माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल नामदेव बारवकर, नंदू पवार, सरपंच गोरख दिवेकर आदी उपस्थित होते.  

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने सलग 15 वर्ष सत्ता भोगली. या काळात ईव्हीएम मशीनवर मतदान झाले होते. तेव्हा मशीन चांगले होते. मग आता मशीनच्या नावाने का ओरडता. बिघाड मशीनमध्ये नाही तर तुमच्या खोपडीत झाला आहे, अशी घणाघाती टीका श्री. फडणवीस यांनी केली . 

राहुल कुल यावेळे बोलताना  म्हणाले, इंग्रजांच्या काळात झालेला मुळशी धरणाचा करार कालबाह्य झाला आहे. या धरणातील पाणी आम्हाला मिळाले पाहिजे. सरकारने तालुक्यात 130 कोटी रूपयांची जलसंधारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. जलयुक्त शिवारची 35 कोटी रूपयांची कामे झाली. रस्त्यांसाठी 800 कोटी रूपयांचा निधी दिला. प्रांत कार्यालय व सत्र न्यायालयाचा निर्णय लवकरच होईल.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख