कितीही आकांड तांडव करा, जनता आमच्या पाठीशीच - देवेंद्र फडणवीस

कितीही आकांड तांडव करा, जनता आमच्या पाठीशीच - देवेंद्र फडणवीस

जालना : कॉंग्रेस-राष्ट्रवादीने संघर्ष, परिवर्तन आणखी कुठल्या यात्रा काढल्या तर काही फरक पडणार नाही. तुम्ही कितीही आकांड तांडव केले तरी राज्यातील जनता आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. निती, नियम, धोरण नसणारे मोदींच्या भितीने एकत्र येत आहेत. पण 35 पक्षांच्या महाठगबंधनला अद्याप त्यांचा नेता ठरवता आलेला नाही. एकत्र आले ते सगळे राज्याचे नेते आहेत, त्यांना देशात कुणीच ओळखत नाही अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मोदी विरोधी आघाडीचाही समाचार घेतला. 

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोशपूर्ण भाषण करत राज्यभरातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. नुकत्यात लागलेल्या राज्यातील काही नगरपालिका आम्ही महापालिकांचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या यात्रा ज्या रस्त्यावरून आणि भागातून जात आहेत तिथे भाजपचा विजय होत आहे. आपल्याला घाबरण्याचे कारण नाही, राज्यातील जनता आपल्या पाठीशी आहे. 

मोदींच्या विरोधात कितीही महागठबंधन होऊ द्या, त्याची चिंता करू नका. कारण आपल्याकडे देशातच नाही तर जगात ओळख असलेले नरेंद्र मोदींसारखे नेते आहेत. तर खिचडी सारख्या महाआघाडीने आधी आपला नेता ठरवावा. शरद पवार मणीपूरमध्ये गेले, देवेगौडा जालन्यात आले, अखिलेश यादव चेन्नईत गेले तर यांचे भाषण ऐकायला कोण येईल ? पण आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या कोणत्याही भागात गेले तर लोक त्यांना ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी करतात. 

शेतकऱ्यांच्या हमीभाव आणि स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशींचे काय झाले या विरोधकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नाला मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले. 2006 ते 14 देशाचे कृषीमंत्री शरद पवार तर पंतप्रधान मनमोहन सिंग होते. इतकी वर्ष हे नेते स्वामीनाथन अहवालावर बसून होते आणि आता आम्हाला विचारतायेत. पण युपीए सरकारचा हा खोडारडेपणा स्वतः स्वामीनाथन यांनीच एका लेखाच्या माध्यामातून उघड केला. तेव्हापासून यांच्या तोंडाला लकवा झाला आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला. 

पीक विम्यात घोटाळा झाला म्हणणाऱ्या विरोधकांनी एका मंचावर येऊन आमच्याशी चर्चा करावी असे खुले आव्हान देतांनाच तीन वर्षात आम्ही पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना 12 हजार कोटी रुपये दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला असून 40 लाख लाभार्थ्यांची यादी पेनड्राईव्हमध्ये आम्ही आमदारांना दिली आहे. 

पण 2008 मध्ये कॉंग्रेस-आघाडीने शेतकऱ्यांना दिलेल्या 6 हजार कोटींच्या कर्जमाफीची यादी बॅंकांकडेही नाही, सरकारकडेही नाही मग कर्जमाफी कुणाला दिली ? असा सवाल करतांना त्याची यादी मला द्या असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला दिले. तसेच आम्ही दिलेली कर्जमाफी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राची आर्थिक मदत आणि पीक विम्याचे पैसे फेब्रुवारी अखेरपर्यंत थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्राकडे पाठवलेला प्रस्ताव अंतिम टप्यात असून लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. 

सल्ले देत बसू नका.. 
लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने यानंतर आता आपण पुन्हा लोकसभा निवडणुकीतील विजयी मेळाव्यासाठीच एकत्र येऊ. खूप कमी दिवस असल्यामुळे झपाट्याने कामाला लागा. हे झाले नाही, ते राहिले असे सल्ले आता देत बसू नका. जी कामे आपण केली आहेत ती घरोघरी जाऊन पोहचवा. दहा पैकी आठ कामे झाली असतील तर ती पटवून सांगा, राहिलेली दोन कामे आपण पुन्हा सत्तेवर आल्यावर करणारच आहोत अशा कानपिचक्‍या देखील फडणवीस यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या. राफेल प्रकरणावरून कॉंग्रेस मोदी सरकारवर टिका करत असल्याचा संदर्भ देतांना, कॉंग्रेसचे कच्चेबच्चे चिंतेत आहेत आणि म्हणून ते बिनबुडाचे आरोप करता आहेत असा टोला फडणवीस यांनी लगावला. 

सुप्रीम कोर्टाने राफेलचे सत्य सांगून कॉंग्रेसचे थोबाड रंगवले आहे. त्यामुळे त्यांनी आता राफेलचे नाव घेऊ नये. राफेलची सगळी कागदपत्र घेऊन एका मंचावर या " दूध का दूध, पाणी का पाणी' करून टाकू असे जाहीर आव्हान देखील मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसला दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com