वाईला विकासाची काशी बनविणार - देवेंद्र फडणवीस

 वाईला विकासाची काशी बनविणार - देवेंद्र फडणवीस

सातारा : गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात विकासाचा प्रयत्न केला आहे. वाईत मदन भोसलेंच्या नेतृत्वाखाली विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. वाई, पाचगणी आणि महाबळेश्‍वर शहरात बदल व्हावा, मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार आहेत. वाई ही गणेशाची नगरी असून ती काशी आहे. या काशीचा विकास व परिवर्तनासाठी लागेल तेवढा निधी राज्य सरकार उपलब्ध करून देईन असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाईतील जाहीर सभेत आज दिला. दरम्यान, मोदींच्या नेतृत्वाखाली आपला देश मजबूत राष्ट्र बनत आहे. त्यामुळे कोणी आपल्या देशाकडे वाकडी नजर करून बघू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रेचे दुपारी वाई शहरात आगमन झाले. येथील रॅलीनंतर जाहीर सभा झाली. यामध्ये फडणवीस बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, माजी आमदार मदन भोसले, खासदार रणजितसिंह निंबाळकर, संजय दादा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वाईत प्रचंड स्वागत केले त्याबद्दल मी वाईकरांचे आभार मानतो. आरपीआयच्या मित्रांचे ही आभार मानतो. मदन दादा तुम्ही वाईत केवळ स्वागत होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ही स्वागताची महासभा उभी राहिली आहे. महाजनादेश यात्रा कशाकरिता याबाबत मोदींनी सांगितले, विरोधी पक्षात असाल तर संघर्ष करा, सत्तेत असाल तर संवाद करा. मागील पाच वर्षात छत्रपतींच्या आशीर्वादाने आम्ही विकास कामे करून महाराष्ट्रात परिवर्तन घडविले. ते जनतेपर्यंत पोहोचवून जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी निघालो आहोत. आता सगळे प्रश्‍न संपले असून पाच वर्षात पारदर्शी काम केले आहे. 

ते पुढे म्हणाले, 15 वर्षाचे कॉंग्रेसचे सरकार आणि आमचे पाच वर्षाचे सरकार याची तुलना केली. तर त्यांच्या दुप्पट काम आम्ही करून दाखविले आहे. सर्व समाज व व्यक्तीच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न केला. पाच वर्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रूपये थेट खात्यावर दिले. 30 हजार किलोमीटरचे ग्रामसडकचे रस्ते तयार केले. 30 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय मार्ग व दहा हजार किलोमीटरचे राज्यमार्ग तयार केले. अकरा हजार गावात पिण्याचे पाणी योजना केल्या. शिक्षणात आपले राज्य 18 व्या क्रमाकांवर होते ते आम्ही तिसऱ्या क्रमांकावर आणले. पुढील वर्षी पहिल्या क्रमांकावर असेल. महाराष्ट्र गुंतवणुकीत पाचव्या स्थानावर होता तो पहिल्या क्रमांकावर आणला. निती आयोगाने आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये रोजगार निर्मितीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. 25 टक्के रोजगार महाराष्ट्राने तयार केला आहे. मोदींचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न आम्ही केले. ग्रामीण भागात सात लाख व शहरी भागात पाच लाख घरे दिली. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे कायम करून त्यांना मालकी हक्क देतोय. गरिबाच्या जीवनात परिवर्तन करतोय. पाच वर्षात आपण विकासाचा प्रयत्न केला. मदन भोसलेंच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. वाई, पाचगणी आणि महाबळेश्‍वर शहरात बदल व्हावा, विकास कामे मोठ्याप्रमात व्हावीत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वाई ही गणेशाची नगरी असून ती काशी आहे. वाईच्या विकास व परिवर्तनासाठी लागेल तेवढा निधी राज्य सरकार उपलब्ध करेल. मोदींच्या नेतृत्वाखाली आपला देश मजबूत राष्ट्र बनत आहे. कोणी आपल्याकडे वाकडी नजर करून बघू शकत नाही. 70 वर्षानंतर नरेंद्र मोदींसारखा वाघ जन्माला आला व त्यांनी 370 कलम रद्द केले. आता तेथील विकास होईल. भारतासोबत जम्मू काश्‍मीर एकसंघ होत आहे. 
लडाख, श्रीनगर मध्ये तिरंगा झेंडा फडकला आहे. मोदी मजबूत राष्ट्र तयार करत आहेत. त्यांच्यासोबत समृध्द महाराष्ट्र तयार करायचा आहे. त्यासाठी आपला जनादेश आहे का, यावर सर्वांनी हात वर करून त्यास प्रतिसाद दिला. आपला आशिर्वाद मोदींना आहे का, मला आहे का, या प्रश्‍नालाही उपस्थित जनसमुदायाने प्रतिसाद देत होकार दिला. 
मुख्यमंत्री भाषणाला उठले व त्यावेळी एकच दादा मदन दादा... अशी घोषणा बाजी झाली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना नक्की ना.. असे विचारल्यावर सर्वांनी जल्लोष करीत प्रतिसाद दिला. 
मदन भोसले म्हणाले, आम्ही काही मागणार नाही. पाठिंबा आणि महाप्रतिसाद देणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी समृध्द आणि सामर्थ्यशाली महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. महागणपती आपल्याला आशीर्वाद व वर देईल. कृष्णामाई आपल्याला महाराष्ट्राचे नवजीवन फुलविण्यासाठी संजीवनी देईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com