Devendra Phadanavis Election Application Valid After Two Hours Hearing | Sarkarnama

तब्बल पावणेदोन तासांच्या सुनावणीनंतर मुख्यमंत्र्यांचा उमदेवारी अर्ज मंजूर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख, अपक्ष प्रशांत पवार आणि आपचे उमेदवार अमोल हाडके यांनी मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याबाबत केलेल्या तक्रारीनंतर तब्बल पावणे दोन तास सुनावणी चालली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला.

नागपूर : कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख, अपक्ष प्रशांत पवार आणि आपचे उमेदवार अमोल हाडके यांनी मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याबाबत केलेल्या तक्रारीनंतर तब्बल पावणे दोन तास सुनावणी चालली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला. चुकीची माहिती असताना अर्ज मंजूर केल्याचा आरोप करत विरोधकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवत तहसील कार्यालय परिसरात सरकार व प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला होता. 'त्यांच्याअर्जात अपूर्ण माहिती आहे. त्याचप्रमाणे शपथपत्रात असलेला नोटरीचा शिक्का हा मुदतबाह्य आहे. शासकीय निवासस्थानावर असलेल्या थकबाकीची माहिती दिली नाही,' असे आक्षेप घेत कॉंग्रेस उमेदवार आशिष देशमुख, अपक्ष उमेदवार प्रशांत पवार व आपचे उमेदवार अमोल हाडके यांनी अर्ज रद्द करण्याची मागणी केली. दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे यांनी सुनावणी घेतली. यावेळी सर्व तक्रारदार व अॅड. सतीश उके तर देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने उदय डबले व संदीप जोशी यांनी बाजू मांडली. 

जवळपास पावणे दोन तास सुनावणी चालली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून विरोधकांच्या सर्व तक्रारी फेटाळून लावत अर्ज स्वीकृत केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कक्षात उभयंतांत चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. त्रुटी व बनावट नोटरीचा शिक्का असताना तो अर्ज स्वीकारल्याचा आक्षेप घेत विरोधकांनी निषेध व्यक्त केला. हुकुमशाही, तानाशाही मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या.

निवडणुकीत सरकारी यंत्रणेवर दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे फडणवीस सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करण्यासाठी राष्ट्रपतींकडे पत्रव्यवहार करण्यात येईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय हा दबावातून देण्यात आला. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे याच्या विरोधात न्यायालयात दाद मागू.
आशिष देशमुख, कॉंग्रेस उमेदवार, दक्षिण-पश्‍चिम मतदार संघ.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाचा निषेध आहे. अधिकाऱ्यावर दबाव टाकून निर्णय घेण्यात आला. फडणवीस यांच्या वकिलांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्‍यक शपथपत्रात नोटरीची आवश्‍यकता नसल्याचे सांगितले आहे. ज्या लोकांनी नोटरी केली नसेल त्या सर्वांचे अर्ज मंजूर केले पाहिजेत. हा निर्णय दुर्दैवी आहे.
प्रशांत पवार, अपक्ष उमेदवार, दक्षिण-पश्‍चिम मतदार संघ.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख