सहा नोव्हेंबर पर्यंत पंचनामे पूर्ण करा : देवेंद्र फडणवीस

पीक विम्याचा लाभ देताना कंपन्यांनी विम्याच्या पावतीचा आग्रह करू नये. पीक विम्याच्या मदतीसाठी करावे लागणारे अर्ज गावातच भरून घ्यावे. पीक विमा कंपन्याचे प्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पोहोचू शकल्या नसल्यास शासकीय यंत्रणांनी केलेले पंचनामे त्यांनी ग्राह्य धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसानीचा फोटोही मदतीसाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. -देवेंद्र फडणवीस
Cm at Chikhalgaon
Cm at Chikhalgaon

अकोला : ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. हाती आलेले निघून गेल्याने शेतकरी वर्ग निराशेच्या छायेत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पंचनाम्यासाठी संवेदशीलपणे कार्य करावे. शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी, यासाठी शेतपिकांचे तीन दिवसांत (सहा नोव्हेंबर पर्यंत) पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हैसपूर फाटा, लाखनवाडा, कापशी, चिखलगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन पिकपाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक घेतली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, आमदार श्रीकांत देशपांडे, गोपिकिशन बाजोरीया, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, नितीन देशमुख, बळीराम शिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,पोलीस अधिक्षक अमोघ गावकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जवळपास शंभर टक्के शेत पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर ही पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पंचनाम्याची कामे तातडीने हाती घ्यावीत. पंचनाम्यांची परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेने संवेदनशीलपणे कामे करावीत. पंचनाम्याच्या कामासाठी आवश्यकता असल्यास इतर विभाग आणि कृषि विद्यापीठाच्या मनुष्यबळाचा उपयोग करावा.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, यावेळी झालेल्या नुकसानीची व्याप्ती सर्वात मोठी आहे. त्यामुळे यामध्ये देण्यात येणारी मदतही मोठी असणार आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दुष्काळ काळातील सर्व मदत ओला दुष्काळाच्या काळातही सर्व शेतकऱ्यांना देण्यात येईल. नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना पीक विमा आधार ठरणार आहे. पीक विम्याबाबत शेतकऱ्यांना एकत्रित सूचना देण्यात याव्यात.

शेतकऱ्यांना सुलभपणे मदत मिळावी, त्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी हेल्पलाईन सुरू करावी. शेतपिकांच्या नुकसानीची व्याप्ती ही सार्वत्रिक आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक मदत राहणार आहे. योग्य व्यक्तींना या मदतीचा लाभ पोहोचावा, यासाठी यंत्रणेने अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कार्य करावे. नुकसानीची मदत मिळण्यासाठी पंचनामा करणाऱ्या यंत्रणांनी अपवादही सोडू नये. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी यंत्रणेने हे आपले काम आहे, असे समजून मिशन मोडमध्ये कार्य करावे. अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी  यावेळी केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com