मुख्यमंत्री सावेंना म्हणाले, आधी दिलेले 100 कोटी खर्च झाल्याचे दाखवा दुप्पट देतो !

मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यासाठी वॉटरग्रीडच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्यांची तहान भागवणार असून या पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही .-देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री सावेंना म्हणाले, आधी दिलेले 100 कोटी खर्च झाल्याचे दाखवा दुप्पट देतो !

औरंगाबादः  जायकवाडी धरण असूनही औरंगाबादला पाण्याचा प्रश्‍न भेडसावतो आहे. या शहराचा पाणी प्रश्‍न कामस्वरूपी सोडवण्यासाठी 1600 कोटींच्या योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील एकही नागरीक पाण्यापासून वंचित राहणार नाही,  असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथील महाजनादेश यात्रेत व्यक्त केला. 

 या शहरातील रस्त्यांसाठी अतुल सावे यांनी जेव्हा माझ्याकडे अतिरिक्त निधी मागितला तेव्हाच, त्यांना मी आधी दिलेल्या शंभर कोटी रुपयांतील 75 टक्के रक्कम खर्च झालेली दाखवा, तात्काळ तुम्हाला आणखी दोनशे कोटींचा निधी देतो असा शब्द दिला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

डीएमआयसी, ऑरिक सिटी, समृध्दी महामार्गामुळे भविष्यात औरंगाबाद आणि जालना ही दोन शहर उद्योगांसाठी मॅग्नेट ठरतील असा दावा देखील फडणवीस यांनी यावेळी केला.

मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे, सततच्या दुष्काळामुळे येरे येरे पावसा म्हणावे लागते, पण असं किती दिवस सहन करणार? मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यासाठी वॉटरग्रीडच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्यांची तहान भागवणार असून या पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही . 

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सभेत  मराठवाड्यातील पाणीप्रश्‍नावर सरकार करत असलेल्या उपाय योजनांचा हवाला देत फडणवीस म्हणाले,  कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या 15 वर्षात शेतकऱ्यांना केवळ 20 हजार कोटींची मदत देण्यात आली होती. आम्ही फक्त पाच वर्षात शेतकऱ्यांना विविध माध्यमांतून 50 हजार कोटींची मदत केली आहे. 

मराठवाड्याची दुष्काळाच्या संकटातून कायमस्वरुपी सुटका करण्यासाठी 64 हजार किलोमीटरच्या ग्रीडच्या माध्यमातून फिल्टर पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून आम्ही जनतेला देणार आहोत. यासाठी वीस हजार कोटींच्या खर्चाला सरकारने मंजुरी दिली आहे. 

याशिवाय गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढत कोकणातील पावसाचे तीनशे टीएमसी पाणी जे समुद्राला जाऊन मिळते, ते बोगद्याच्या माध्यमातून मराठवाड्याकडे वळण्याची महत्वाकांक्षी योजना आम्ही राबवत आहोत. यातून 167 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळेल.

नदीजोड प्रकल्प तसेच मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कृष्णा खोऱ्यातून देणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. या प्रकल्पासांठी लागेल तेवढा मोदीजींच्या सरकारकडून आणीन पण मराठवाडा दुष्काळमुक्त करणारच असा विश्‍वास देखील त्यांनी उपस्थितांना दिला. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com