मोहिते पाटलांच्या मागणीसाठी फडणवीस मोदींकडे जाणार....

....
devendra-fanavis--ranjitsinh mohite patil
devendra-fanavis--ranjitsinh mohite patil

अकलूज : कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी आम्ही केंद्राकडे जाऊ व योजना मंजूर करून आणू. जलशक्ती मंत्रालयाने माढा लोकसभा मतदारसंघाची निवड केली आहे. 100 मतदारसंघांसाठी पंतप्रधानांनी सात हजार कोटींची तरतूद केली आहे. या माध्यमातून मतदारसंघात मोठी कामे होतील, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अकलूज (ता. माळशिरस) येथे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचा प्रारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते.

माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी केंद्राकडे देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा करण्याची विनंती केली. तालुक्‍यातील रस्त्यांच्या कामासाठी 39 कोटी रुपये तसेच विजय गंगा अभियानासाठी व सिमेंट बंधाऱ्यांसाठी निधी मिळावा, अशी मागणी केली.

अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, सहकारमहर्षींनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आहे. सहकारमहर्षींनी सहकारी संस्था उभारून शेतकऱ्यांची उन्नती करण्यासाठी प्रयत्न केला. सहकार चळवळ पक्की राहिली तर विकास होतो हे या भागात आल्यानंतर लक्षात येते. सध्याच्या ठाकरे सरकारची कर्जमाफी योजना फसवी असून पक्षभेद विसरून लोक सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरू लागले आहेत. हे क्षेत्र मजबूत होणे गरजेचे आहे.

विजय गंगा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ
भांबुर्डी येथील विजय गंगा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ, शिवामृत दूध संघावर पुतळ्याचे अनावरण व एक मेगावॉट सोलर प्रकल्पाचे उद्‌घाटन, मच्छी मार्केटचे उद्‌घाटन, डाळिंब, फळे मार्केट इमारतीचे उद्‌घाटन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले होते.

श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात तीन पक्ष समान कार्यक्रमावर सत्तेत आले आहेत, तो समान कार्यक्रम म्हणजे भाजपला दूर ठेवा आणि आपला फायदा करून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच रयतेचे राज्य पुन्हा येवो, शेतकऱ्यांना बलशाली करण्याचे काम सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी केले आहे. हा वारसा त्यांची पुढील पिढी चालवीत आहे. आमच्या सरकारच्या काळात सहकार क्षेत्राला बळकटी दिली असून उसाचे दर एफआरपीप्रमाणे 99 टक्के वाटप केले आहेत. साखर कारखानदारी वाचविण्यासाठी दोन हजार कोटींची मदत केली. कर्जाच्या माध्यमातून मदत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखरेचा दर निश्‍चित केल्यामुळेच उसाला चांगला दर मिळत आहे. 50 वर्षांपूर्वी हा कायदा होऊनही मागील सरकारने त्याची अंमलबजावणी केली नव्हती, मात्र पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी साखरेचा दर निश्‍चित केला आहे. 94 लाख हेक्‍टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते. 25 हजार रुपये हेक्‍टरी मदत जाहीर केली. प्रत्यक्षात ती मदत अद्याप मिळालेली नाही. कर्जमाफी फसवी असून कोणाचाही सात-बारा कोरा झालेला नाही. आमच्या काळात 19 हजार कोटींची कर्जमाफी झाली होती व 50 हजार कोटी थेट अनुदान दिले होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार पृथ्वीराज देशमुख, जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, माजी खासदार धनंजय महाडिक, बबनराव अवताडे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, कल्याणराव काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, विक्रम देशमुख, विजयराज डोंगरे, माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सभापती शोभा साठे, मार्केट कमिटीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, उपसभापती मामासाहेब पांढरे, किशोरसिंह माने-पाटील, बाबाराजे देशमुख, जयसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com