devendra fadavnis public meeting in sangli | Sarkarnama

फडणवीसांची सभा सांगली कॉंग्रेस कमिटीच्या अंगणात 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

राज्यातील एकापाठोपाठ एक महापालिका नगरपालिका सर करीत निघालेल्या भाजपचा अश्‍वमेध सांगलीतही दौडणार की रोखणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री या सभेत सांगली,मिरज,कुपवाड महापालिकेसाठी किती कोटींचे पॅकेज जाहीर करतात याकडेही सर्वांचे लक्ष असेल. मुख्यमंत्र्यांनी गेल्या चार वर्षात पॅकेजच्या घोषणांचा सपाटा लावला आहे. 

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कालचा सांगली दौरा मराठा आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे रद्द झाला असला तरी सोमवारी महापालिका निवडणूक प्रचाराच्या समारोपास ते सांगलीत येणार असल्याचे येथील भाजप सुत्रांनी सांगितले. त्यासाठी भाजपने थेट कॉंग्रेस कमिटीचे अंगणच बुक केले आहे. 

सांगली-मिरजेवर कॉंग्रेसचेच राज्य आहे. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले आहे. या मिशन महापालिकेचा समारोप मुख्यमंत्री करणार आहेत. 

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात केवळ सांगली आणि जळगाव महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे राजकारणातील हवा कोठे वाहते हे ठरवणारीच ही निवडणूक असेल. सत्ताधारी भाजपसाठी इथले यश खूपच गरजेचे आहे. सर्वात जास्त जागा लढवणारा भाजप हा पक्ष आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर झेंडा फडकलाच पाहिजे यासाठी मंत्र्यांची फौज उतरवली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची सांगलीतील प्रचाराची तारीखही निश्‍चित केली होती. 

27 रोजी सांगली-मिरजेत सभा आणि आष्टा येथे अप्पर तहसिल कार्यालयाचे उद्‌घाटन असा जंगी कार्यक्रम होता मात्र मराठा आंदोलनामुळे नियोजन विस्कटले. महापालिका निवडणुकीची मशागत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अख्खे मंत्रीमंडळ गेल्या महिन्यात प्रदेश भाजप कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने येणार होते. मात्र कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कार्यकारणीची बैठकच रद्द झाली. त्यानंतर आता समारोपात मुख्यमंत्र्यांच्या दोन सभांचे नियोजन होते. मात्र तेही विस्कटले आता. निदान समारोप करून शेवटचा धक्का देण्याचा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा इरादा आहे. जिथे कॉंग्रेस-राष्ट्रवादीने प्रचाराचा प्रारंभ केला तिथेच कारभाराचा महापालिकेच्या वीस वर्षाच्या कारभाराचा पंचनामा करायचा भाजपचा इरादा आहे. सभेसाठी दुपारी एक ते साडे चारपर्यंतची परवानगी काढली आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख