devendra fadavnis on jaykumar gore | Sarkarnama

जयकुमार गोरेंना मंत्री करणार : फडणवीस

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

कुणाचे काहीही ठरले असले तरी द्वेषभावनेने पछाडलेल्यांना जनता घरी बसवणार आहे.

बिजवडी (सातारा) : माझा आशीर्वाद आणि साथ फक्त कमळाला असून जयकुमार गोरेंना जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून द्या, त्यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्रीपद देतो असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

म्हसवड (ता. माण, जि.सातारा) येथे भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, बाळासाहेब मासाळ, विकल्प शहा उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, सध्या सुरु असलेल्या निवडणूक रणधुमाळीत आम्हाला मजाच येत नाही. आमच्या समोर तुल्यबळ कुणीच नाही. आमचे सर्व पैलवान तेल लाऊन तयार आहेत. समोर लढाईला पैलवानच नाही. जयकुमार गोरेंनी तर माण - खटावमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादीला चिन्हावर लढायला माणूसच ठेवला नाही. जयकुमार गोरे लढवय्या आहेत. त्यांच्यावर अगोदरपासूनच आमचा डोळा होता. हिरा पारखण्याची नजर आहे. त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे माढ्याचा लोकसभेचा गड जिंकला.  

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, जयकुमार गोरेंच्या पाठिशी मुख्यमंत्र्यांचे आशिर्वाद आणि पाठबळ आहे. कुणाचे काहीही ठरले असले तरी द्वेषभावनेने पछाडलेल्यांना जनता घरी बसवणार आहे. मुख्यमंत्री जयकुमारांच्या आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख