devendra fadavnis conduct bakari ead meeting | Sarkarnama

बकरी ईद : मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा, सुव्यवस्थेचा आढावा 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

सणाच्या काळात मदतीसाठी गेल्यावर्षीप्रमाणेच मुंबई व राज्यासाठी वेगवेगळे हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात यावे. राज्याच्या सीमा तपासणी नाक्‍यांवर जनावरे घेऊन येणाऱ्या वाहनांना जास्त काळ थांबवून ठेवू नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.  

मुंबई : राज्यात बकरी ईदचा सण शांततेत साजरा व्हावा, यासाठी प्रशासनाने योग्य दक्षता घेतली आहे. या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलिसांनी नियोजन करावे. हा सण शांततेने चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

बकरी ईद सणानिमित्त राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात तसेच मुंबईतील व्यवस्थेबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री नसीम खान, आमदार वारीस पठाण, अमीन पटेल, अस्लम शेख, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्यासह अधिकारी व शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गेल्या चार वर्षात अतिशय चांगल्या प्रकारे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला आहे. यंदाही शांततेत व चांगल्या प्रकारे हा सण साजरा करावा. सणाच्या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांनी योग्य ती सावधगिरी बाळगावी. 

बकरी ईदसाठी मुंबईतील देवनार पशुवधगृह येथे महापालिकेने चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. तेथे पाणी साचून बकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच स्वच्छता, पशुवैद्यकीय चिकित्सा यासाठी पुरेसे अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात यावे. पशुवधगृहात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने दक्षता घ्यावी. तसेच तेथे सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस चौकी उभारावी. पूर्व मुक्त महामार्गावर गाड्या अडविल्यामुळे वाहतूक थांबणार नाही, याची काळजी घ्यावी. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख