devendra fadavnis and mla bharat bhalke come together | Sarkarnama

तीन महिन्यांपुर्वी फडणवीसांना विरोध करणारे भारत भालके आता त्यांच्यासोबत!

भारत नागणे
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

आमदार भालके यांचे भाजपसोबत चांगलेच सूत जुळले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

पंढरपूर : मराठा समाजाला आरक्षण जाहीर करुनच मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीची  विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात येऊ नये अशी रोखठोक भूमिका घेणारे काँग्रेसचे आमदार भारत भालके आज मुंबईतील एका कार्यक्रमात विठ्ठल मूर्तीच्या प्रतिष्ठापणेच्या कार्यक्रमात चक्क मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित राहिल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील आमदारांशी जवळीक साधण्याचा प्रय़त्न सुरु केला आहे. शिवसेनेला युतीसाठी साद घातली आहे. त्यातच यापुढचा मुख्यमंत्री देखील मीच असेन, या त्यांच्या जाहीर दाव्यामुळे विरोध पक्षाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

आमदार भारत भालके हे महाराष्ट्रात जएंटकिलर म्हणून अोळखले जातात. 2009 साली महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री खासदार विजसिंह मोहिते पाटील यांचा पराभव आमदार भालकेंनी केला होता. त्यानंतर 2014 साली ही त्यांनी पारंपारिक विरोधक आमदार प्रशांत परिचारक यांचा पराभव करुन त राज्याच्या राजकारणात त्यांनी वेगळी आेळख तयार केली.
 
सोलापूरच्या सहकारी  साखर कारखानदारीच्या राजकारणात मात्र त्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी जवळीक साधत विरोधकांना शह देण्याचा प्रय़त्न केला आहे.
मागील दोन वर्षापासून आमदार भालके आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उठबस वाढली आहे. आमदार भालकेंच्या ताब्यात असलेल्या विठ्ठल साखर कारखान्यांना मंत्री देशमुख यांनी वेळोवेळी मदत देखील केली आहे. सहकाराच्या राजकारणातूनच आमदार भालके आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मैत्री अधिक घट्ट झाली आहे.

आषाढी एकादशी सोहळ्यापूर्वी राज्यात मराठा समाजाने आरक्षणाच्या प्रश्नावरुन आंदोलन पुकारले होते. अशातच मराठा क्रांती मोर्चाने आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देणार नाही घोषणा केली होती. त्याचवेळी आमदार भालकेंनी देखील मराठा क्रांती मोर्चाला पाठींब देत मुख्यमंत्र्यांनी आधी आरक्षण जाहीर करावे, मगच पंढरपुरात शासकीय महापूजेसाठी यावे अन्याथा त्यांना येऊ देणार नाही इशारा दिला होता. त्यांच्या इशारानंतर वातावरण अधिकच चिगळले होते. सुरक्षेच्या कारणास्तव अखेर मुख्यमंत्र्यांनी आपण विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी येणार नसल्याचे जाहीर केले होते. 

या घटनेला जेमतेम तीन महिने उलटले असतानाच आज मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या मुख्यालयातील विठ्ठलमूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आवर्जून उपस्थित असल्याने राजकीय निरीक्षक देखील अचंबीत झाले आहेत. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे देखील उपस्थित असल्याने आमदार भालके यांचे भाजपसोबत चांगलेच सूत जुळले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख