सामान्यांना न्याय द्या; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सामान्यांना न्याय द्या; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : सामान्य नागरिकांच्या तक्रारी समजून घेत प्रशासकीय यंत्रणेने त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य नागरिकांनी मांडलेल्या मुद्दावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

मंत्रालयात 109 वा लोकशाही दिन आज झाला. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यावेळी उपस्थित होते. यावेळी मुंबई, उल्हासनगर, वाशीम, नाशिक, उस्मानाबाद, शहापूर, शिरूर, वैजापूर, परतूर येथील नागरिकांच्या 12 विविध तक्रारींवर सुनावणी करण्यात आली. आतापर्यंत लोकशाही दिनात दाखल 1 हजार 481 तक्रारींपैकी 1 हजार 480 तक्रारी निकाली निघाल्या.

शहापूर येथे ग्रामपंचायत निधीतून पाणी पुरवठा करण्याकरिता आपल्या शेतात विनापरवानगी टाकलेल्या जलवाहिनीमुळे शेती, नांगरणी करता येत नाही अशी तक्रार सीताबाई तरणे या महिलेने केली. मंत्रालयात झालेल्या लोकशाही दिनात सीताबाई व त्यांचा मुलगा उपस्थित होते.

 माय-लेकाचे म्हणणे ऐकल्यानंतर ठाणे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत माहिती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नंतर क्षेत्रीय यंत्रणेने तक्रारदारांच्या अर्जावर माहिती देताना प्रत्यक्ष स्थळपाहणी करून वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. लोकांना न्याय देण्यासाठी आपली यंत्रणा असताना त्या भावनेने काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उस्मानाबाद येथील सुभद्रा शेळके यांनी मुलाच्या मृत्यू बाबत सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्यांचे संपूर्ण म्हणणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले. 

अंधेरी येथील विनोद बाक्कर या विद्यार्थ्याने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन अर्ज केला होता. अर्ज ऑनलाईन न भरल्याने आणि दहावी उत्तीर्ण नसल्याने त्यांना शिष्यवृत्ती नाकारली होती. मात्र बाक्कर यांनी मुक्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला होत. त्यांच्या अर्जावर विमुक्त जाती व भटक्‍या जमाती आणि इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्ग कल्याण विभागाने सुनावणी करताना बाक्कर यांना ऑफलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे मान्य केले.

 त्यानुसार त्यांना 21 जून 2018 रोजी शिष्यवृत्ती देण्यात आली. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर डीबीटी पोर्टलमध्ये मुक्त विद्यपीठाचा समावेश करावा,असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. शिवाय शिष्यवृत्ती विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या खात्यावर जमा करूनही महाविद्यालयाने विद्यार्थ्याकडून शुल्क घेतले असल्यास महाविद्यालयाकडून शुल्क परत घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com