devendra fadanvis on pollution | Sarkarnama

प्रदूषणाचे संकट दहशतवादापेक्षा मोठे : देवेंद्र फडणवीस 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 जून 2019

प्रदूषणाचे संकट जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानपेक्षा मोठे आहे. प्रदूषणाचे स्वरूप दहशवादापेक्षा कमी नाही. यामुळे पर्यावरण पूरक विकासासाठी वृक्ष लागवड आणि त्यांचे संगोपन हाच एकमेव उपाय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उमरेड येथे म्हणाले. 

नागपूर : प्रदूषणाचे संकट जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानपेक्षा मोठे आहे. प्रदूषणाचे स्वरूप दहशवादापेक्षा कमी नाही. यामुळे पर्यावरण पूरक विकासासाठी वृक्ष लागवड आणि त्यांचे संगोपन हाच एकमेव उपाय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उमरेड येथे म्हणाले. 

सरकारच्या 35 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी जनजागृती वृक्षदिंडीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटींवार, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन व पर्यावरण राज्यमंत्री परिणय फुके, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधीर पारवे, अनिल सोले, उमरेडच्या नगराध्यक्ष विजयालक्ष्मी भदोरिया यांच्या उपस्थितीत उमरेड येथे करण्यात आला. 

दरवर्षी एकाच खड्ड्यात झाडे लावत असल्याचा आरोप आमच्यावर केला जातो. लावलेल्या झाडांपैकी 80 टक्के वृक्ष वाचतात. त्यांना टॅगिंगची सोय असल्याने गैरप्रकार होणार नाहीत याची खात्री आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यात 35 कोटी वृक्ष लागवड केल्याशिवाय थांबणार नाहीत. विदर्भाच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्याचे संगोपण करण्याचा संकल्प करण्याची आज गरज आहे असेही फडणवीस म्हणाले. 

वृक्षलागवडीचा संदेश राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचला असल्याचे सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. प्रास्ताविक अनिल सोले यांनी, तर संचालन डॉ. मुकेश मुद्‌गल यांनी केले. यावेळी आमदार नागो गाणार, गिरीश व्यास, आमदार मल्लीकाजूर्न रेड्डी, जिल्हा परीषद अध्यक्ष नीशा सावरकर, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. उमरेड शहरात सत्र न्यायालयाच्या इमारतीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जाईल. जिल्हा मुख्यालयाव्यतिरिक्त पहिले जिल्हा सत्र न्यायालय उमरेडमध्ये सुरू होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जून महिन्यात ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन या संस्थेने वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. तसेच उमरेड शहरात वनविभागाच्या तीन एकर जमिनीवर 900 पेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात आली. उमरेडमध्ये वृक्ष लागवड कार्यक्रमात फळझाडे लावण्याची मागणी आमदार पारवे यांनी केली आहे, ती पूर्ण केली जाईल, असे वनमंत्री मुनगंटीवर यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख