देवेंद्र फडणवीस आता ख-या अर्थाने, ‘मास लीडर’ बनलेत : विनय सहस्त्रबुद्धे

देवेंद्र फडणवीस आता ख-या अर्थाने, ‘मास लीडर’ बनलेत : विनय सहस्त्रबुद्धे

पुणे : देवेंद्र फडणवीस सरकारने समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी अनेक चांगले उपक्रम राबविले. नीती, नियत आणि नेतृत्व या सर्वच गोष्टींमध्ये फडणवीस सरकार आतापर्यंतच्या राज्य सरकारांपेक्षा उजवे ठरले आहे. त्यामुळे सरकारच्या योजनांची आणि कामांची माहिती आपण स्वतःहून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविली पाहिजे. चांगल्या लोकांचा चांगुलपणा आपण स्वतःहून लोकांसमोर आणून दिला पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि ‘आयसीसीआर’चे अध्यक्ष विनयजी सहस्रबुद्धे यांनी पुण्यामध्ये केले.

‘अकॅडमिक्स फॉर देवेंद्र’च्या वतीने पुण्यातील पीवायसी क्लब येथे आयोजित‘थिंकर्स मीट’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमामध्ये पुण्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ आणि अनुभवी मंडळी उपस्थित होती. अशा पद्धतीने मान्यवरांशी संवाद साधून त्यांच्या सूचना तसेच कल्पना जाणून घेण्याचे कार्यक्रम राज्यात सर्वत्र घेण्यात येणार असून, त्याची सुरुवात पुण्यापासून झाली.

‘हा उपक्रम म्हणजे लोकांच्या आकांक्षांची जनसुनवाई आहे. या निमित्ताने राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतील विचारी सज्जनशक्ती एकत्र आली आहे,’अशा शब्दात कौतुक करून सहस्रबुद्धे म्हणाले, की 2014 साली केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर दोन्ही सरकारांकडून नागरिकांच्या खूप अपेक्षा होत्या. नागरिकांच्या अपेक्षांचे दडपण सरकारवर होते. मात्र, कार्यमग्नता, झोकून देऊन प्रश्न धसास लावण्याची वृत्ती, कार्यनिष्ठा आणि कर्तृत्व यांच्या जोरावर नरेंद्रभाई आणि देवेंद्रजी यांनी सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केला. समान कार्यपद्धती आणि दोन्ही नेत्यांमधील समन्वय यामुळे सर्व अडीअडचणींवर मात करून लोकांच्या अपेक्षांची प्रामाणिकपणे पूर्तता करण्याचा प्रयत्न केंद्रात आणि राज्यातही झाला. त्यामुळेच भारतीय मतदारांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात भरभरून मते दिली आणि नरेंद्रभाईंना पुन्हा एकदा राज्य करण्याची संधी दिली.

आता महाराष्ट्राची निवडणूक जवळ आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले. मात्र, देवेंद्रजीं कधीच कोणाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडले नाही. ते फक्त काम करीत राहिले.  प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःला सिद्ध केले. त्यामुळेच देवेंद्रजी आता ख-या अर्थाने, ‘मास लीडर’ बनले आहेत. जलयुक्त शिवारपासून ते समृद्धी महामार्गापर्यंत आणि मेट्रोचे जाळे वेगाने उभारण्यापासून ते गोरगरीबांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यापर्यंत देवेंद्रजींनी अनेक ठिकाणी स्वतः लक्ष घातले. नजीकच्या भविष्याचा विचार न करता दूरदृष्टी ठेवून दीर्घकालीन धोरण आखले आणि त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळेच खऱ्या अर्थाने, ‘महाराष्ट्र पुढे चालला आहे,’ यापुढेही ही वाटचाल अशाच पद्धतीने सुरू राहिली पाहिजे आणि त्यासाठी समाजातील सज्जनशक्ती सक्रिय व्हायला हवी,’ असे ठाम मत सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. 

फोर्स मोटर्सचे अभय फिरोदिया यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, की इंग्रज गेले आणि भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. नरसिंह राव यांच्या काळात भारताने सोशालिस्ट धर्तीच्या आर्थिक धोरणालाही तिलांजली दिली. आता सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या आड येणाऱ्या सोशालिस्ट मानसिकतेतील नोकरशाहीचा बंदोबस्त व्हायला हवा. नोकरशाहीच्या मनोवृत्तीमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. तसे केले तर भ्रष्टाचार मोडून काढण्याची प्रक्रिया वेगाने पुढे जाईल आणि विकासाला अधिक गती मिळेल.

कार्यक्रमात डॉ. के. एल. संचेती, प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, भरत फाटक, लेखक प्रशांत पोळ, अरुण नहार, धनंजय धोरडे, ‘डिक्की’चे मिलिंद कांबळे आणि ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे लेखक आशिष चांदोरकर यांनी मनोगत व्यक्त केले. 

संस्कारांमध्ये वाढलेले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला एक दिवस फोन आला. त्यांच्या मावशीची गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया करावयाची होती. त्यासंदर्भात आमचे बोलणे झाले. प्रत्यक्ष शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बहिणीसोबत राहिल्या. कोणत्याही अतिरिक्त सोयीसुविधा न घेता त्या साईड बेडवर राहिल्या आणि आपल्या बहिणीची सेवा केली. अशा संस्कारांमध्ये आपले मुख्यमंत्री वाढले आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे, अशी आठवण डॉ. के. एल. संचेती यांनी सांगितली.

महाराष्ट्राचे नेतृत्व विश्वासास पात्र

जागतिक बँक एखाद्या देशाला किंवा राज्याला कर्ज देताना किंवा अर्थसहाय्य देताना नेता कोण आहे, त्याची कार्यशैली किंवा कर्तृत्व काय आहे, हे पाहून मदत करीत असते. महाराष्ट्राचे नेतृत्व आश्वासक आहे. धडाडीचे आहे आणि विश्वास ठेवण्यास पात्र आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला मदतीचा हात पुढे करताना जागतिक बँक सहजपणे राजी होते, असा अनुभव जागतिक बँकेमध्ये तज्ज्ञ म्हणून काम करण्याचा अनुभव असलेल्या अजित पटवर्धन यांनी सांगितला. 

विकास काकतकर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील मागील भूमिका विशद केली. तर अनिकेत काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com