देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जावर दुपारी तीन वाजता होणार सुनावणी - devendra fadanvis court case | Politics Marathi News - Sarkarnama

देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जावर दुपारी तीन वाजता होणार सुनावणी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सन 1996 आणि 1998 मध्ये बदनामी आणि फसवणूक केल्याची दोन प्रकरणे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखल आहेत. 2014 च्या निवडणुकीत आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती लपवल्याचा आरोप करीत अॅड. उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज त्या प्रकरणाची सुनावणी होती. 

नागपूर : सन 1996 आणि 1998 मध्ये बदनामी आणि फसवणूक केल्याची दोन प्रकरणे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखल आहेत. 2014 च्या निवडणुकीत आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती लपवल्याचा आरोप करीत अॅड. उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज त्या प्रकरणाची सुनावणी होती. 

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे वकील उदय डबले यांनी आजच्या दिवसापुरती देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात यावी असा अर्ज केला. त्यावर दुपारी तीन वाजता सुनावणी होईल, असे उदय डबले यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले.

आज न्यायालयात उपस्थित राहण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांची अडचण आहे, असे उदय डबले यांनी न्यायालयाला सांगितले. देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते आहेत. ते वादग्रस्त व्यक्तिमत्त्व नसल्यामुळे त्यांना उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला केल्याचे उदय डबले यांनी सांगितले. 

याप्रकरणी उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा न्यायालयाने यासंबंधी आज सुनावणी ठेवली होती. आज देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीला पाठवणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे केले नाही, तर वकिलामार्फत उपस्थित राहण्यापासून सूट मिळण्याचा अर्ज दाखल केला. त्यांची ही विनंती फेटाळून लावावी, अशी मागणी याचिकाकर्ते उके यांनी न्यायालयाला केली आहे. सोबतच देवेंद्र फडणवीस यांचा अर्ज फेटाळावा, अशी मागणी सुद्धा उके यांनी न्यायालयाला केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख