भाजपच्या देवयानी फरांदेंना शेफाली भुजबळ टक्कर देणार का ? 

भाजपच्या देवयानी फरांदेंना शेफाली भुजबळ टक्कर देणार का ? 

नाशिक : मध्य नाशिक मतदारसंघात कॉंग्रेसच्या पारंपरिक मुस्लिम, दलित मतदारांचे वर्चस्व असतानाही गत निवडणुकीत भाजपने येथे बाजी मारली. परंतु गेल्या पाच वर्षांत अनेक राजकीय उलथापालथ झाली. त्यामुळे मतदारांचा कौल नेमका कोणाला याचा अंदाज नाही.

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या विरोधात स्वपक्षातील वसंत गिते आणि हिमगौरी आडके प्रबळ इच्छुक असल्याने फरांदेंना उमेदवारीसाठी परिश्रम घ्यावे लागतील. 

आतापर्यंत दलित, मुस्लिम मतदारांकडून निर्णायक आघाडी देण्याचे काम झाले. यंदाही त्यांच्या मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. विद्यमान आमदारांना पराभूत करण्याची परंपरा या मतदारसंघात आहे. यंदा ती कायम राहणार की नवा पायंडा पडणार, याची उत्सुकता आहे.

 मतदारसंघाचे विभाजन होण्यापूर्वी हा नाशिक मतदाससंघ होता. 1995, 1999 मध्ये (स्व.) डॉ. दौलतराव आहेर निवडून आले.2004 मध्ये कॉंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी डॉ. आहेरांना पराभूत केले. 2009 मध्ये पुनर्रचना झाली. त्यात मनसेचे वसंत गिते पहिले आमदार ठरले. 2014 मध्ये मोदी लाटेत येथील मतदारांनी "कमळ' हाती घेत प्रा. देवयानी फरांदे यांना आमदार केले. 

फरांदेंना भाजपचेच आव्हान 
भाजपमध्ये उमेदवारी मिळविण्यात रस्सीखेच आहे. एकीकडे विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे उमेदवारीसाठी प्रयत्नात आहेत. त्यांना भाजपमधूनच आव्हान आहे. इच्छुकांतील तिढा सोडविण्यात पक्षाला यश आले तर ठीक, अन्यथा बंड होण्याचीदेखील शक्‍यता आहे. लोकसभा निवडणुकीत युतीवर मतदार मेहेरबान झाल्याने अनेकांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले आहेत. 

त्यात स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव पुढे आले आहे. स्थायी समितीचे आणखी एक माजी सभापती व नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सुरेश पाटील यांनादेखील या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा असल्याने स्पर्धकांची संख्या वाढली आहे. स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, विश्‍वास बॅंकेचे अध्यक्ष विश्‍वास ठाकूर यांनीही रिंगणात उडी घेण्याची तयारी सुरू केली आहे. 

शिवसेनेलाही आशा 
युती झाल्यास मध्य मतदारसंघ शिवसेनेकडे यावा ही शिवसेनेची इच्छा आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते माजी महापौर विनायक पांडे, महानगरप्रमुख सचिन मराठे, संजय चव्हाण हे इच्छुक आहेत. मुस्लिम, दलित मतांच्या आधारे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा आशा आहे. युतीपेक्षाही अधिक इच्छुक या पक्षांकडे आहेत. 

कॉंग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील आणि राहूल दिवे यांनी त्यासाठी वर्षेभर तयारी केली आहे. नेहेमीप्रमाणे शाहू खैरे, डॉ. शोभा बच्छाव यांनीही उमेदवारी मागीतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भुजबळ कुटुंबीयांपैकी शेफाली भुजबळ यांचे नाव घेतले जाते. त्याव्यतिरिक्त गजानन शेलार व नगरसेवक सुफी जीन इच्छुकांच्या यादीत आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेची आघाडी होण्याची आशा मनसेच्या इच्छुकांना आहे. त्यात माजी आमदार नितीन भोसले, माजी महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख यांचे नाव घेतले जाते. 

विधानसभा 2014 
देवयानी फरांदे (भाजप) : 61,548 
वसंत गिते (मनसे) : 33,276 
अजय बोरस्ते (शिवसेना) : 24,549 
शाहू खैरे (कॉंग्रेस) : 26,393 
 
लोकसभा 2019 
हेमत गोडसे (शिवसेना) :94,429 
समीर भुजबळ (राष्ट्रवादी) : 56,459 
पवन पवार (बहुजन वंचित आघाडी) : 15,405 
माणिकराव कोकाटे (अपक्ष) : 5,964 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com