वडिलांच्यानंतर मुलाकडे आली सांस्कृतिक खात्याची धुरा....

वडिलांच्यानंतर मुलाकडे आली सांस्कृतिक खात्याची धुरा....

लातूर : सांस्कृतिक मंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. आता त्यांचे पुत्र अमित देशमुख यांच्याकडे या खात्याची जबाबदारी आली आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तयार झालेले सांस्कृतिक धोरण मागील सरकारच्या दुर्लक्षामुळे अजूनही पूर्णपणे अंमलात आले नाही. त्यामुळे वडिलांचे स्वप्न मुलगा पूर्ण करणार का, याची उत्सुकता सांस्कृतिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याच्या जबाबदारी आली आहे. अमित देशमुख हेही वडीलांप्रमाणे रसिक वृत्तीचे आहेत. ते या खात्यावर आपला ठसा उमटविणार का, याचीही अनेकांना उत्सुकता आहे. सांस्कृतिक धोरणाकडे मागील सरकारने दुर्लक्ष केले, अशी टीकाही सांस्कृतिक वर्तुळातून वारंवार झाली. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ साहित्यिक आणि सांस्कृतिक धोरण समिटीचे अध्यक्ष आ. ह. साळुंखे म्हणाले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आमच्या समितीने कष्टपूर्वक सांस्कृतिक धोरण तयार केले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विविध अंगाने अभ्यास केला. महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशांना, सामाजिक स्तरांना विकासाच्या संधी कशा मिळतील, हे पाहिले. यातील काहीच गोष्टी अमलात आल्या. नव्या सरकारने याकडे गांभीर्याने पहावे, असे माझे मत आहे. 

माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, विलासराव हे सांस्कृतिक मंत्री असताना आणि मुख्यमंत्री असतानाही त्यांचे या खात्याकडे विशेष लक्ष असायचे. भौतिक विकास आणि सांस्कृतिक विकास, हे विकासाचे दोन डोळे आहेत. हे दोन्ही डोळे तेजस्वी असायला हवेत. यापैकी एक डोळा आंधळा असेल तर बाकीच्या विकासाला अर्थ नाही, असे विलासराव नेहमी सांगायचे. सांस्कृतिक धोरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. पण दुर्दैवाने मागच्या सरकारने ते बासनात गुंडाळले. पण हे धोरण या सरकारने आणि अमित यांनी पुन्हा पुढे आणावे, असे मला वाटते. 

विलासरावांनी ज्ञानोबा-तुकोबा पुरस्कार, प्रभाकर पणशीकर पुरस्कार, अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत नाटक पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, पंडित भीमसेन जोशी पुरस्कार असे कितीतरी महत्वाचे पुरस्कार सुरू केले. केवळ पुरस्कार नव्हे तर साहित्य, संगीत, लोकनाट्य अशा क्षेत्रातील संस्थांना मदतीचा हात दिला. कलावंत, साहित्यिकांचा त्यांनी कायम आदर राखला, अशा आठवणींना पवार यांनी उजाळा दिला.अशीच चमकदार कामगिरी अमितही करतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी त्यांच्या वडिलांसोबत होतो. आता त्यांच्यासोबत असेन, असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com