हैदराबाद : बेवारस मृतदेहाला हात लावण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याचे प्रकार अनेक वेळा समोर येतात. परंतु, एका महिला पोलीस अधिकाऱ्याने बेवारस मृतदेह स्वत:च्या खांद्यावर दोन किलोमीटर वाहून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता त्या अधिकाऱ्याने बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले आहेत.
AP Police cares: DGP Gautam Sawang lauds the humanitarian gesture of a Woman SI, K.Sirisha of Kasibugga PS, @POLICESRIKAKULM as she carried the unknown dead body for 2 km from Adavi Kothur on her shoulders & helped in performing his last rites.#WomanPolice #HumaneGesture pic.twitter.com/QPVRijz97Z
— Andhra Pradesh Police (@APPOLICE100) February 1, 2021
श्रीकाकुलम जिल्ह्यातील पलसा येथील कसिबुग्गा पोलिस स्थानकात महिला पोलिस उपनिरीक्षक के. सिरीशा यांची नियुक्ती आहे. अडावीकोट्टारू येथे शेतात एक बेवारस मृतदेह आढळल्याची माहिती त्यांना मिळाली. सिरीशा या तातडीने घटनास्थळी गेल्या. त्यांनी स्थानिकांना त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. मात्र. स्थानिकांनी अंत्यसंस्कारास नकार दिलाच पण दोन किलोमीटरवर असलेल्या स्मशानभूमीपर्यंत मृतदेहाला खांदा देण्यास नकार दिला. अखेर सिरीशा यांनी मृतदेहाला खांदा दिला आणि एक जण पुढे आले. त्या दोघांनी मिळून तो मृतदेह दोन किलोमीटर अंतरावरील स्मशानभूमीत उचलून नेला आणि त्यावर अंत्यसंस्कार केले.
सिरीशा यांचा मृतदेह खांद्यावर वाहून नेतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यानंतर सिरीशा यांनी मानवतावादी भूमिकेतून केलेल्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक गौतम सवांग यांनी सिरीशा यांनी दाखविलेल्या या मानवतेचे कौतुक केले आहे. याचबरोबर पोलीस अधीक्षक गौतम सवान यांनीही सिरीशांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.
के. सिरीशा या स्वतः आदिवासी समाजातील आहे. वसतिगृहात राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांची नियुक्ती बहुतांश वेळा आदिवासी भागातच झालेली आहे. तेथील परिस्थितीची जाणीव असल्याने आदिवासी नागरिकांच्या मदतीला त्या कायम पुढाकार घेत असतात. या भागात रुग्णवाहिका नसल्याने गर्भवतींना प्रसूतिसाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्या त्यांच्या पोलिस जीपचाही वापर करतात.
Edited by Sanjay Jadhav

