धक्कादायक : महिला आयपीएसला रोखण्यासाठी पोलीस यंत्रणाच होती सज्ज

विशेष पोलीस महासंचालकांनी महिला आयपीएसचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
woman ips stopped from complaining about sexual harassment by dgp
woman ips stopped from complaining about sexual harassment by dgp

चेन्नई : विशेष पोलिस महासंचालकांनी भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, संबंधित महिला आयपीएसने तक्रार करु नये यासाठी तिची अडवणूक करुन तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रकार पोलीस यंत्रणेनेच केल्याची बाब आता उजेडात आली आहे. 

तामिळनाडूचे विशेष पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेश दास यांच्याविरुध्द तक्रार करण्यात आली आहे. तक्रार करण्यात आलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी होती. ही महिला अधिकारी संबंधित जिल्ह्याची पोलिस अधीक्षक आहे. या दौऱ्यादरम्यान त्या दास यांच्या कारमधून प्रवास करत होत्या. या कारमध्येच दास यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप महिला अधिकाऱ्याने केला आहे. 

दरम्यान, महिला अधिकाऱ्याला तक्रार करण्यापासून रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा कामाला लावण्यात आली होती. तिच्या मोटारीच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत होती, अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी तिला तक्रार न करण्याची सूचना केली होती. ती तक्रार करण्यासाठी चेन्नईला जात होती त्यावेळी अनेक वेळा तिला इशारा देण्यात आला तसेच, तिचा मार्गही अडवण्यात आला. दोन अधिकाऱ्यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. यातील एक तिचा सहकारी व समान रँकचा अधिकारी होता. हे सर्व दास यांच्या सांगण्यावरुन सुरु होते असे नंतर या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. 

ती जात असलेली मोटार थांबण्यात आली नंतर तिला जबरदस्ती मोबाईलवरुन विशेष पोलीस महासंचालक दास यांच्याशी बोलण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिला धमकावून तिच्या मोटारीची चावीही काढून घेण्यात आली. यावर तिने ही संपूर्ण घटना रेकॉर्ड करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला मोटारीची चावी परत देण्यात आली. तिने नंतर मोटारीचा चालक आणि कर्मचाऱ्यांना मोबाईल बंद करण्यास सांगितले. अनेक टोल नाक्यांवर तिची मोटार अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर तिने कशालाही न जुमानता चेन्नई गाठली आणि तक्रार नोंदवली. 

महिला अधिकाऱ्याने दास यांची तक्रार राज्याचे पोलिस महासंचालक जे. के. त्रिपाठी आणि गृह सचिवांकडे केली. त्यानंतर विरोधी पक्षांनीही संबंधित महिला अधिकाऱ्याची बाजू घेत कारवाईची मागणी केली. द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनीही सरकारने कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन यांनीही या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. दास यांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर राज्य सरकारने तातडीने समिती नेमून चौकशीचे आदेश  दिले आहेत. तसेच दास यांची बदलीही केली आहे. 

गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. के. प्रभाकर यांनी बुधवारी दास यांच्या चौकशीचा आदेश काढला. चौकशीसाठी सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी जयश्री रघुनंदन समितीच्या अध्यक्ष आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत दास यांची बदली करून नियुक्तीच्या प्रतिक्षा यादीत टाकण्यात आले आहे. तसेच त्यांचा विशेष डीजीपीचा दर्जाही काढून घेण्यात आला आहे. 

दरम्यान, तमिळनाडूमध्ये एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याविरुध्द पहिल्यांदाच अशी तक्रार झालेली नाही. यापूर्वीही अॉगस्ट 2018 मध्ये एका महिला पोलिस अधिक्षकांनी सतर्कता आणि भ्रष्टाचार विरोधी संचालनालयाचे तत्कालीन सह संचालक एस. मुरूगन यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यावेळीही एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर पीडित महिला अधिकारी उच्च न्यायालयापर्यंत गेली होती. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com