सल्ले देणारे सेलिब्रिटी आता शेतकरी आंदोलकांचं अभिनंदन करणार का?

आता शेतकरी आंदोलनावर सेलिब्रेटींच्या इच्छेनुसार "AMICABLE" म्हणजे सौहार्दपूर्ण उपाय मिळाला आहे.
सल्ले देणारे सेलिब्रिटी आता शेतकरी आंदोलकांचं अभिनंदन करणार का?
sachin Sawant

मुंबई : एक वर्षांच्या प्रखर लढाईनंतर केंद्र सरकारने (Central Government) लागू केलेले केंद्रीय कृषी कायदे (Agricultural act) अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांसह देशभरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण गेल्या वर्षभरात कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सौहार्दापूर्ण तोडगा काढावा, असे अनेक सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांना सल्ले दिले होते. या सर्व सेलेब्रिटींवर आता महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस सचिन सावंत (sachin Sawant)यांनी टिका केली आहे.

शेतकऱ्यांना सौदार्हपुर्ण तोडगा काढण्याचे सल्ले देणाऱ्या सेलिब्रिटींना सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी शेतकऱ्यांचं अभिनंदन करण्याचं आवाहन केलं आहे. ''आता सेलिब्रेटींच्या इच्छेनुसार "AMICABLE" म्हणजे सौहार्दपूर्ण उपाय मिळाल्याने, शेतकऱ्यांच्या न्यायासाठीच्या निडर लढ्याबद्दल अभिनंदनाच्या ट्विटची अपेक्षा करुया का? भाजपा नेत्यांनी टॅग केले वा ट्विट शब्दशः जुळल्यासही हरकत नाही. भाजपाने आधीसारखा त्यांना मसुदा द्यावा ही विनंती.'' असं ट्विट करत सावंत (Sachin Sawant) यांनी शेतकऱ्यांना अभिनंदन करण्याचे आवाहन केले आहे.

sachin Sawant
भाजपच्या बावनकुळेंना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसकडून राजेंद्र मुळक?

शेतकरी आंदोलनादरम्यान विराट कोहली, सुरेश रैना, सायना नेहवाल, यांच्यासह अनेक खेळाडूंनी शेतकरी आंदोलकांना शांततेच्या आणि सौहार्दपूर्ण मार्गाने तोडगा काढण्याचे सल्ले दिले होते. या सर्वांचे ट्विटच्या फोटोंचा स्क्रिनशॉट शेअर करत त्यांनी शेतकऱ्यांना अभिनंदन करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर त्यांनी अक्षय कुमार, अनिल कुंबळे व लता मंगेशकर यांचेही ट्वीट सोशल मीडियावर शेअर त्यांच्यावर निशाणा साधला.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये 'सेलिब्रिटींना हवा असलेला सौहार्दपूर्ण तोडगा निघाला आहे, असे म्हणत त्यातील 'सौहार्दपूर्ण तोडगा' या शब्दाकडं त्यांनी लक्ष वेधलं आहे. त्यामुळे आता हे सेलिब्रिटी शेतकऱ्यांच्या लढ्याचं कौतुक करणारे ट्वीट नक्की करतील, अशी अपेक्षा सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सेलिब्रिटींनी अभिनंदनाचे ट्वीट करताना भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना टॅग करायला हरकत नाही, असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांनीही पूर्वीप्रमाणे सेलिब्रिटींना ट्वीट लिहून द्यावेत,' असा खोचक टोलाही सावंत यांनी लगावला आहे.

नक्की काय आहे प्रकरण -

एक वर्षापुर्वी कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु झाले. केंद्र सरकारने केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला. परंतू पोलीसांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश नाकारला. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवरच ठाण मांडत वेशीवरच आंदोलन सुरु केलं. तर केंद्र सरकारनेही कृषी कायदे मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेकदा केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्याही निष्फळ ठरल्या. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम होते. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. अनेकदा हिंसाचार झाला. तरीही शेतकरी मागे हटण्यास तयार नव्हते.

याच दरम्यान, देशातील नामवंत खेळाडू, कलाकारांसह अनेक सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांना शांततापूर्ण तोडगा काढण्याचा सल्ला दिला. काही सेलिब्रिटींनी सरकारकडून होत असलेल्या चर्चेच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. तर, काही सेलिब्रिटींनी आंदोलनाला बाहेरून पाठिंबा दिला. यात शेतकऱ्यांना सल्ले देणाऱ्या अनेकसेलिब्रिटींचे ट्विट्स एकाच प्रकारचे होते. त्यातील काही शब्द एकसारखे होते. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. आता केंद्र सरकारने माघार घेतल्यानंतर हेच सेलिब्रिटी आणि भाजपवर कॉंग्रेसने टीकास्त्र डागले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in