who in shivsena knew about sushant and his family asks lawyer vikas singh | Sarkarnama

सुशांत आणि त्याच्या वडिलांबद्दल शिवसेनेतील कुणाला एवढी माहिती होती? विकाससिंह यांचा सवाल

वृत्तसंस्था
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरून उठलेला गदारोळ कायम आहे. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुशांतच्या वडिलांबाबत केलेल्या उल्लेखावरुन गदारोळ उडाला आहे.  

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. आता सुशांत आणि त्याच्या वडिलांचे संबध ताणलेले होते, असा उल्लेख शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर सुशांतच्या वडिलांचे वकील के.के.सिंह यांनी आता प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ईडीने रियाचे चार्टर्ड अकाउंटंट  रितेश शाह आणि संदीप श्रीधर यांची चौकशी केली होती. याचबरोबर सॅम्युएल मिरांडा याची ईडीने तब्बल नऊ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. ईडीने या प्रकरणी रिया, शोविक यांच्यासोबत श्रुती यांची चौकशी 7 ऑगस्टला झाली होती. त्यानंतर 8 ऑगस्टला पुन्हा रिया आणि शोविक चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. ईडीला या प्रकरणी इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडले आहेत. आता ते रिया, तिचे वडील आणि भाऊ यांचे कॉल रेकॉर्ड तपासत आहेत. सुशांतच्या खात्यावरुन काही जणांच्या खात्यावर पैसे वर्ग झाले होते. या प्रकरणीही रियासह तिच्या वडिलांची चौकशी करण्यात येत आहे. 

सुशांत आणि त्याच्या वडिलांचे संबध ताणलेले होते, असा  उल्लेख शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सामनातील लेखात केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सुशांत आणि त्याच्या वडिलांचे संबंध बिघडलेले होते. सुशांत त्याच्या वडिलांना किती वेळा पाटण्याला भेटायला गेला? मला त्याच्या वडिलांबद्दल सहानुभूती आहे. मात्र, या प्रकरणातील अनेक गोष्टी समोर यायच्या आहेत.  

यावर सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी राऊत आणि शिवसेनेला लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सुशांत आणि त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते एवढी माहिती शिवसेनेतील कोणाला आहे? सुशांत आणि त्याच्या वडिलांना शिवसेनेतील कोण एवढे चांगले ओळखत होते की त्यांनी कौटुंबीक बाबी सांगितल्या असतील. शिवसेना अशा प्रकारे बोलत आहे याचे मला दु:ख वाटते. 

रियासोबत राहत असतानाही सुशांत पाटण्याला वडिलांना भेटायला गेला होता. त्याने वडिलांना गावाला नेले होते आणि काही काळ तो त्यांच्यासोबत होता. आता हे संबंध चांगले नसतील तर कोणत्या संबंधांना चांगले म्हणायचे? मला तर मग चांगले संबध काय असतात हेच माहिती नाही असेच म्हणावे लागेल, असे सिंह यांनी नमूद केले. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख