पवन ऊर्जेच्या टर्बाईनचा वापर जलशुद्धिकरणासाठी...कोण बरोबर मोदी की राहुल? - who is right about wind turbine can produce clean drinking water | Politics Marathi News - Sarkarnama

पवन ऊर्जेच्या टर्बाईनचा वापर जलशुद्धिकरणासाठी...कोण बरोबर मोदी की राहुल?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

पवन ऊर्जेच्या टर्बाईनचा वापर जलशुद्धिकरणासाठी करावा, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यावरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले असून, राहुल गांधींनीही मोदींना लक्ष्य केले आहे. 

नवी दिल्ली : पवन उर्जेच्या टर्बाईनचा वापर जलशुद्धीकरणासाठी करावा, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या वक्तव्याची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खिल्ली उडवली असून, यावर सोशल मीडियावर वाद सुरू पेटला आहे. या मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपलेली असताना दोघांपैकी खरे कोण, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. यातील शास्त्रीय सत्य आणखी वेगळचे असल्याचे समोर येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवन उर्जा क्षेत्रातील एका कंपनीच्या मुख्याधिकाऱ्यांशी साधलेल्या संवादादरम्यान, पवन उर्जेवर चालणाऱ्या टर्बाईनचा उपयोग करून स्वच्छ पेयजल, प्राणवायू आणि उर्जानिर्मिती केली जाऊ शकते, असे म्हटले होते. यावरुन सोशल मीडियावर मोदी यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. 

मोदींच्या या वक्तव्याची खिल्ली उडविणारे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. अशा प्रकारचे टर्बाईन हवेतून पाणी तयार करत असल्याची बातमीही राहुल यांना टॅग केली. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांचे अज्ञान हा भारतासाठी खरा धोका नाही. प्रत्यक्षात, त्यांच्या जवळ असणाऱ्यांपैकी कोणामध्येही त्यांना सत्य सांगण्याची हिंमत नाही. 

राहुल गांधींच्या या ट्विटनंतर भाजप नेतेही संतापल्याचे दिसून आले. भाजपच्या अनेक नेत्यांनी यावरून राहुल यांच्यावर जोरदार टीका करताना, त्यांनी विज्ञानाचा अभ्यास करावा, असा सल्ला दिला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी यासंबंधीचे दोन शोधनिबंध पाठवून ते वाचण्याची सूचना राहुल गांधींना ट्विटवर केली आहे. या विषयाची क्लिष्टता पाहता तुम्हाला ते समजणार नाही, असा टोलाही लगावला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालविय यांनीही राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. 

पवन ऊर्जेच्या टर्बाईनमधून जलशुद्धिकरण होऊ शकते का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, पवन ऊर्जेचे टर्बाईन पिण्याचे शुद्ध पाणी तयार करु शकतात. ईओल वॉटरने 2012 मध्ये अशा प्रकारचे टर्बाईन तयार केले होते आणि त्यातून तासाला 62 लिटर पाणी मिळत होते. पवन ऊर्जेपासून वीज तयार करण्याचे काम टर्बाईन करतात, त्याचप्रमाणे ते पाणीही तयार करु शकतात. 

टर्बाईन हवा शोषून घेऊन ती शीतकरण कॉम्प्रेसरमध्ये पाठवतील. या हवेतील आर्द्रता बाजूला काढून त्यापासून पाणी तयार करता येते. दिवसाला अशा प्रकारे एक हजार लिटर पाणी मिळू शकते. परंतु, ही प्रक्रिया अतिशय खर्चिक असून, सध्या तरी व्यवहार्य नाही. यामुळे मोदींचे विधान बरोबर असले तरी ते व्यवहार्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख