
50th CJI D.Y. Chandrachud : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ आज (11 मे) ला निकाल जाहीर करणार आहेत. हा निकाल फक्त शिवसेनेसाठीच महत्त्वाचा नाही, तर या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्य न्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली. उदय लळीत यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर विराजमान होणारे दुसरे मराठी व्यक्ती आहेत.
चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड (CJI) हे भारताचे 16 वे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड हे जवळपास सात वर्षे आणि चार महिने सरन्यायाधीश होते. हा सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील सरन्यायाधीश म्हणून सर्वात मोठा कार्यकाळ होता. २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ पर्यंत ते सरन्यायाधीश होते. धनंजय चंद्रचूड यांची आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय गायिका आहेत.
न्यायमूर्ती चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांचा जन्म पुण्यात झाला. चंद्रचूड यांचं मुळ गाव पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या कनेरसर आहे. चंद्रचूडांचं शालेय शिक्षण हे मुंबईतील कॅथड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमध्ये झालं. दिल्ली विद्यापीठातून गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्याच 'लॉ' सेंटरमधून 'एलएलबी' केले. त्यानंतर अमेरिकेच्या 'हार्वर्ड लॉ' स्कूलमधून न्यायशास्त्रात 'एलएलएम' आणि 'डॉक्टरेट' मिळवली. तसेच त्यांना हार्वर्ड विद्यापीठाने न्यायशास्त्र विषयाचा 'जोसेफ बेले' पुरस्कार देऊन गौरवले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होण्यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि गुजरात, कोलकत्ता, प्रयागराज, मध्य प्रदेश आणि दिल्ली उच्च न्यायालयांमध्ये वकील म्हणून प्रॅक्टिस केली. 1998 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नामांकन दिले. 1998 ते 2000 पर्यंत त्यांनी भारताचे अतिरिक्त 'सॉलिसिटर जनरल' म्हणून काम केले. वकील म्हणून, न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या सर्वात महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये घटनात्मक आणि प्रशासकीय कायदा, HIV+ रुग्णांचे हक्क, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांचे हक्क आणि कामगार आणि औद्योगिक कायदा यांचा समावेश आहे.
न्यायमूर्ती चंद्रचूड हे अनेक घटनापीठांचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा भाग राहिले आहेत. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. यामध्ये अयोध्या जमीन वाद, 'आयपीसी'च्या कलम ३७७ अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणे, आधार योजनेची वैधता, शबरीमाला प्रकरण, लष्करातील महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन, भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन सारख्या निर्णयांचा समावेश आहे.
Edited by : Rashmi Mane
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.