कोव्हॅक्सिनबाबत 'डब्लूएचओ' महिनाअखेरीस देणार 'गुड न्यूज'!

देशातील भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता अद्याप मिळालेली नाही.
कोव्हॅक्सिनबाबत 'डब्लूएचओ' महिनाअखेरीस देणार 'गुड न्यूज'!
who approval for covaxin may come in the month end

नवी दिल्ली :  देशातील भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना लशीला जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) मान्यता अद्याप मिळालेली नाही. यामुळे ही लस घेणाऱ्या भारतीयांना परदेशांत प्रवास करण्यात अनेक अडचणी येत होत्या.  अखेर ही मान्यता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता आहे. लसीकरणविषयक राष्ट्रीय तज्ञ समितीचे प्रमुख डॉ.व्ही.के.पॉल यांनी माहिती दिली आहे. 

डॉ. पॉल म्हणाले की, भारत बायोटेकने लशीबाबतची सर्व कागदपत्रे डब्लूएचओकडे जुलैमध्ये सादर केली होती. आम्हाला आता याबाबत सकारात्मक घडामोडी समजू लागल्या आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल. या महिन्याच्या अखेरीस हा सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. आपण डब्लूएचओला निर्णय घेण्यास काही कालावधी द्यायला हवा. परंतु, लवकरच घेतला जाईल, अशी आशा आहे. कारण कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना परदेशात प्रवास करण्यात अडचणी येत आहेत. 

कोव्हॅक्सिनचा समावेश इमर्जन्सी यूज लिस्टिंगमध्ये (ईयूएल) करावा, यासाठी डब्लूएचओकडे अर्ज केला आहे. जुलै अथवा सप्टेंबर महिन्यात लशीला मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे, असे भारत बायोटेकने याआधी म्हटले होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा जग खुले झाले आहे. भारतीयांनाही जगाची कवाडे उघडी झाली आहेत. तसेच, परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा शिक्षण सुरू झाले आहे. परंतु, यात एक नवीन अडचण निर्माण झाली आहे. डब्लूएचओने कोव्हॅक्सिनला मान्यता दिलेली नाही. 

जगातील आघाडीची विद्यापीठेही त्यांच्या देशांनी अथवा डब्लूएचओने मान्यता दिलेली लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच परवानगी देत आहेत. कोव्हॅक्सिन घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात गेल्यानंतर सक्तीच्या हॉटेल विलगीकरणात राहावे लागेल. हॉटेलमध्ये 14 दिवस राहणे हे विद्यार्थ्यांसाठी खर्चिक आहे, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. 

डब्लूएचओने फायजर, मॉडर्ना आणि कोव्हिशिल्ड या कोरोना लशींना मान्यता दिली आहे. परंतु, या लशींच्या यादीत कोव्हॅक्सिन नाही. या लशीच्या परिणामकारकतेबाबत आणखी माहिती सादर करावी लागेल, असे डब्लूएचओचे म्हणणे होते. यावर भारत बायोटेकने म्हटले होते की, डब्लूएओची मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक असलेली 80 टक्के कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. उरलेली कागदपत्रे जून महिन्यात सादर केली जातील. लवकरात लवकर आम्हाला ही परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in