कंगनाच्या बंगल्याचे बांधकाम कधीचे ? ; खुलासा करण्याचा उच्च न्यायालयाचा पालिकेला आदेश   - When was Kangana's bungalow built  | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाच्या बंगल्याचे बांधकाम कधीचे ? ; खुलासा करण्याचा उच्च न्यायालयाचा पालिकेला आदेश  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

कंगना राणावतच्या बंगल्यातील महापालिकेने जमीनदोस्त केलेले बांधकाम पूर्वीपासून होते की नव्याने बांधण्यात येत होते, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या बंगल्यातील महापालिकेने जमीनदोस्त केलेले बांधकाम पूर्वीपासून होते की नव्याने बांधण्यात येत होते, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. तर समाजमाध्यमांवर सरकार विरोधात मत मांडले म्हणून ही कारवाई केली, असा आरोप कंगनाकडून करण्यात आला आहे. तर महापालिकेने नियमानुसार कारवाई केली, असा दावा पुन्हा पुरवणी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

पाली हिल येथील कंगनाच्या बंगल्यामधील कथित अवैध बांधकामावर महापालिकेने कारवाई केली आहे. याविरोधात तिने केलेल्या याचिकेवर न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू झाली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जे बांधकाम पाडले आहे ते यापूर्वीच रितसर परवानगी घेऊन बांधण्यात आले होते.

या बांधकामानंतर जानेवारीमध्ये केलेल्या पूजेची छायाचित्रे कंगनाच्या वतीने अॅड. बिरेंद्र सराफ यांनी दाखल केले. तसेच तिच्या घराबाबत आलेला एक लेखही सादर करण्यात आला. त्यामुळे पालिकेने तोडलेले बांधकाम जुने होते, नवीन काम सुरु नव्हते, असे यावेळी सांगण्यात आले. जेव्हा महापालिकेने नोटीस बजावली होती, तेव्हा केवळ पाणीगळतीवर काम सुरु होते, असेही कंगनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

वांद्र्यातील पाली हिल येथील अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यातील बेकायदा बांधकाम मुंबई महापालिकेने पाडले होते.  महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बोलल्याने माझ्या बंगल्यावर कारवाई करण्यात आली, असे कंगनाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. तिने म्हटले आहे की, माझ्या मतांमुळे काही घटक नाराज झाले आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या राजकीय पक्षाचे लोकही संतप्त झाले. याच पक्षाची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. 

मुंबई महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. कंगनाच्या कर्मचाऱ्यांनी नोटीस न स्वीकारल्याने बंगल्याच्या दर्शनी भागी ती लावण्यात आली होती. बंगल्यात झालेल्या कामाच्या परवानगीची कागदपत्रे 24 तासांत सादर करण्याची मुदत तिला देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर महापालिकेचे पथक बुलडोझर घेऊन कंगनाच्या बंगल्यावर गेले. पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत भाग हातोडा आणि बुलडोझरच्या सहाय्याने पाडून टाकला होता. 

हा बंगला निवासी असल्याने त्यात कार्यालय सुरू करण्यासाठी रीतसर परवानगी घेणे गरजेचे होते. पालिका अधिनियम 354 (अ) अंतर्गत कोणत्याही निवासी जागेचा व्यावसायिक वापर करता येत नाही, असेही या नोटिशीत म्हटले होते. या बंगल्यामध्ये चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी वाढीव बांधकामही करण्यात आले आले; तर पूर्वीची दोन बांधकामे जोडण्यात आली आहेत. तसेच अंतर्गत बदलही करण्यात आले आहेत. यात स्वच्छतागृह तोडून त्या जागी कार्यालय बांधण्यात आले आहे. तसेच परवानगी न घेता नवे स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे, असे प्रथमदर्शनी दिसते, असे नोटिशीत नमूद केले होते. 

कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत काम : 
1) ग्राऊंड फ्लोअरवरील टॉयलेटला ऑफिस केबिन मध्ये रूपांतरीत केले आहे
2) स्टोअर रूमचा किचन रूम मध्ये रूपांतर 
3) ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर अनधिकृत टॉयलेट 
4) तळ मजल्यावर अनधिकृत किचन तयार
5 ) देवघर आणि लिव्हिंग रूम अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन 
6 ) पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय
7 ) समोर बाजूस अनधिकृत स्लॅबची निर्मिती
8 ) दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत जिना निर्मिती
9 ) दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी निर्मिती
 Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख