कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आल्यास दुसरा डोस कधी घ्यावा? - when covid positive patients should take their second dose if vaccine | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आल्यास दुसरा डोस कधी घ्यावा?

वृत्तसंस्था
सोमवार, 10 मे 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर भर दिला आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोना (covid19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. यामुळे सरकारने कोरोना लसीकरणावर (vaccnation) भर दिला आहे. परंतु, अनेक जण कोरोना लशीचा पहिला डोस (First Dose) घेतल्यावर पॉझिटिव्ह येत आहेत. यामुळे अशा रुग्णांनी दुसरा डोस (Second Dose) कधी घ्यावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी सर्वांचेच शंकासमाधान केले आहे. 

कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसरा डोस कधी घ्यावा, याबद्दल डॉ. गुलेरिया म्हणाले की, कोरोना लस घेण्याचे वेळापत्रक कोणत्याही स्थितीत पाळायला हवे. पहिला डोस घेतल्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह आल्यास दुसरा डोस घ्यायला हवा. कोरोना संसर्ग झाला तरी लस घेणे टाळू नये. 

कोरोना विषाणू म्युटेट होत असून, त्यावर लस प्रभावी ठरेल का, यावर डॉ. गुलेरिया म्हणाले, कोरोना लशीबाबत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे असलेल्या आकडेवारीनुसार सध्या असलेल्या विषाणूच्या प्रकारांवर ही लस परिणामकारक ठरत आहे. परंतु, यासाठी कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पुढील काळात लशीचा प्रभाव पडणार नाही असे प्रकार येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला कायम लस आणखी विकसित करावी लागेल. 

हेही वाचा : मी लशीचे दोन्ही डोस घेतले असून, मला काही होणार नाही, असं म्हणणारे डॉक्टर हरले कोरोनाशी झुंज 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख