राज ठाकरेंना सल्ला देणाऱ्या संभाजीराजेंच्या मनात चाललयं काय?

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मनसे नेते राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
राज ठाकरेंना सल्ला देणाऱ्या संभाजीराजेंच्या मनात चाललयं काय?
Sambhaji Raje Chhatrapati sarkarnama

नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधलेली नाही असे स्पष्टपणे सांगतानाच, ‘इतिहास 100 टक्के माहिती असेल तरच त्यावर बोलावे अन्यथा अशा विषयांना हात लावू नये,' अशा शब्दांत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज मनसे नेते राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपल्यावर आपण निश्चितपणे सक्रिय राजकारणात उतरणार आहोत, असे सांगताना कोणता राजकीय पक्ष निवडणार, याबाबत संभाजीराजे यांनी तूर्त पत्ते उघडले नाहीत. मात्र त्याबाबतची घोषणा लवकरच पुण्यात जाहीर करू असे ते म्हणाले. ( What is going on in the mind of Sambhaji Raje who advised Raj Thackeray? )

संभाजीराजे यांची भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. त्यांच्या खासदारपदाची मुदत आज संपली. त्यानिमित्त लोधी इस्टेट भागातील आपल्या सरकारी निवासस्थानातील कागदपत्रे, वस्तूंची हलवाहलव व अन्य तयारीबाबत ते दिल्लीत होते. येथून ते गुजरातेतील राजकोटला गेले. राजर्षींचे शिक्षण राजकोट येथे झाले होते व मीही तेथील शाळेत शिकलो होतो. त्यामुळे पण शाळेला भेट देण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी राजकोटला जात आहोत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

 Sambhaji Raje Chhatrapati
खासदार संभाजी राजे साधणार शेतकऱ्यांच्या मुलांशी संवाद

छत्रपती शिवरायांच्या समाधीबाबत महाराष्ट्रात उफाळलेल्या वादाबाबत संभाजीराजे म्हणाले की, छत्रपतींचा वंशज या नात्याने मी हे निश्चित सांगू शकतो की शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेलेली नाही. इतिहास पूर्णपणे माहित असेल तरच बोलावं नाही तर अशा विषयांना हात लावू नये. राज ठाकरे यांचे याबाबतचे वक्तव्य इतिहासाला धरून नाही. त्यांनी या विषयाचा नीट अभ्यास करावा. जबाबदार नेत्याने असे जाहीर वक्तव्य करणे चूक आहे. शिवरायांची समाधी 1925 मध्ये बांधण्यात आली. त्याचे श्रेय शिवप्रेमींचे, साऱ्या लोकांचे आहे. महात्मा फुले यांना ही समाधी दिसली व तिचे काम 1925 मध्ये झाले पण त्याचे श्रेय साऱ्या शिवभक्तांचे आहे. कोमालाही व्यक्तिगत श्रेय देता येणार नाही.

 Sambhaji Raje Chhatrapati
अशोक चव्हाणांना दोन दिवसांचे अल्टीमेटम देणारे छत्रपती संभाजी राजे नरमले ..? 

दरम्यान राज्यसभेची मुदत संपल्यावर आपण सक्रिय राजकारणात उतरणार याचा पुनरूच्चार संभाजी राजे यांनी केला. ते म्हणाले की राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त 6 मे रोजी कार्यक्रम आहे. त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपला राजकीय कार्यक्रम जाहीर करणार असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे काय करायचे, हे आपल्या डोक्यात नक्की झाले आहे तथापि त्याची घोषणा नंतर करू असे त्यांनी सांगितले.

दिल्लीचे व महाराष्ट्राचे अशा दोन्ही ठिकाणचे राजकारण आवडते. दोन्हीकडे माझे संपर्क वाढले आहेत. याला दोन्ही अँगल असे आहेत की एकीकडे महाराष्ट्राची जनता माझ्याकडे या दृष्टीने बघते की शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन दिल्लीत जायला हवे. दिल्लीतल्या लोकांना वाटते की शिवाजी महाराज, राजर्षी शाहूंचा वंशज आला आहे. तेव्हा इथे त्याची ताकद वाढायला हवी. तेव्हा दिल्लीच्या व महाराष्ट्राच्या या दोन्ही माध्यातून पण राजकारणात सक्रिय होणार आहोत असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.