'ड्रग्ज कनेक्शन'प्रकरणी आधी भाजप नेत्याला अन् नंतर त्याच्या दोन्ही मुलांना अटक

भाजप नेत्या पामेला गोस्वामींना ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर आता आणखी भाजप नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.
west bengal police arrests bjp leader rakesh singhs two sons in pamela goswami case
west bengal police arrests bjp leader rakesh singhs two sons in pamela goswami case

कोलकता : भाजपच्या नेत्या पामेला गोस्वामी यांना अमली पदार्थांसह अटक झाली आहे. गोस्वामींनी या प्रकरणी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्ती व पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य राकेशसिंह यांना जबाबदार धरले होते. पोलिसांनी राकेशसिंह यांना  आधी अटक केली आणि नंतर त्यांच्या दोन्ही मुलांना अटक केली आहे. 

अटकेच्या भीतीने राकेशसिंह यांनी काल (ता.23)  उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोलकता पोलिसांनी चौकशीसाठी बजावलेल्या समन्सच्या विरोधात त्यांनी याचिका केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. अटकेसह पोलीस कारवाईपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालाकडे केली होती. मात्र, न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नव्हता. 

उच्च न्यायालयाने राकेशसिंह यांची याचिका फेटाळल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. राकेशसिंह यांच्या निवासस्थानी पोलिसांना छापे घातले. या वेळी झडती घेताना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अडवले. तसेच, घरातही प्रवेश करु दिले नाहीत. अखेर राकेशसिंह यांना पोलिसांनी पूर्व बर्धवान जिल्ह्यातून अटक केली. 

त्यानंतर राकेशसिंह यांच्या दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात त्यांच्या दोन्ही मुलांचा संबंध असल्याचे समोर आहे. त्यांच्या मुलांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, राकेशसिंह यांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले. 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य सरचिटणीस पामेला गोस्वामी यांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गोस्वामी, त्यांचा मित्र प्रबीर डे आणि सुरक्षा रक्षकासह दक्षिण कोलकत्यातील न्यू अलीपूर परिसरातून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 100 ग्रॅम कोकेन जप्त केले होती. त्याची किंमत सुमारे 10 लाख रुपये होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थांच्या तस्करीत काही काळापासून गोस्वामींचा सहभाग आहे. त्या अमली पदार्थांची खरेदी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून गोस्वामी त्यांचा साथीदार प्रबीर डे आणि सुरक्षारक्षकाला अटक केली. त्यांच्याकडून कोकेन जप्त करण्यात आले. 

गोस्वामी यांनी याचे खापर स्वपक्षातील अन्य सहकाऱ्यांवर फोडले होते. भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्ती राकेशसिंह यांनीच माझ्याविरोधात हे कारस्थान रचले असून, त्यांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करावी, अशी मागणी गोस्वामींनी केली होती. यामुळे भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर येऊन पक्षातील ड्रग कनेक्शन समोर आले. यामुळे राकेशसिंह यांच्यासह विजयवर्गीयही अडचणीत आले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com