भाजपवर ममतादीदी पडल्या भारी...पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर उतारा! - west bengal government reduced tax on petrol and diesel | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपवर ममतादीदी पडल्या भारी...पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर उतारा!

वृत्तसंस्था
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील सलग बारा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. 

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असताना मागील सलग 12 दिवस इंधन दरवाढ सुरू होती. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. यावरुन केंद्रातील भाजप सरकारला विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येऊ लागले आहे. आता पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंधन दरवाढीवर जनतेला उतारा देऊन भाजपला धक्का दिला आहे.  

अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली आहे. इंधन दरवाढीवरुन भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधक लक्ष्य करीत आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत इंधन दरवाढीचा भडका आता ममता बॅनर्जींच्या मदतीला आल्याचे चित्र आहे. 

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या सरकारने  पेट्रोल आणि डिझेलवरील करात प्रतिलिटर एक रुपयाची कपात केली आहे. ही कपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. याबाबत बोलताना पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा म्हणाले की, इंधन दरवाढीच्या बोजाने जनता त्रस्त झाली आहे. त्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. आजच्या घडीला पेट्रोलवर प्रतिलिटर 32.90 रुपये कर केंद्र सरकारला मिळतो. राज्याला पेट्रोलवर केवळ 18.46 रुपये कर मिळतो. डिझेलच्या बाबतीत विचार करावयाचा झाल्यास केंद्राला प्रतिलिटर 31.80 रुपये आणि राज्याला 12.77 रुपये कर मिळतो. केंद्र सरकार मात्र, कर कमी करत नाही. 

हेही वाचा : सलग बारा दिवसांच्या भडक्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक

आज तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ न केल्याने दरात कोणताही बदल झाला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर आज प्रतिलिटर 90.58 रुपये आहे. याचवेळी डिझेलचा दर प्रतिलिटर 80.97 रुपये आहे. बंगळूरमध्ये  पेट्रोल प्रतिलिटर 93.61 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 85.84 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल प्रतिलिटर 92.59 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 85.98 रूपये आहे. पुण्यात पेट्रोल प्रतिलिटर 94.64 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 86.38 रुपये आहे. 

आयात केलेल्या खनिज तेलावर प्रक्रिया करून पेट्रोल-डिझेलचे उत्पादन होते. त्यानंतर प्रक्रिया, वाहतुकीचा तसेच, पणन खर्च आणि नफा असे मिळून सुमारे ३.७५ रुपये प्रतिलिटर होतात. त्यानंतर केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क लागू होते. त्यामध्ये प्रतिलिटर मूलभूत उत्पादन शुल्क १.४ रुपये, विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क ११ रुपये आणि कृषी संरचना व विकास उपकर २.५ रुपये आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क १८ रुपये असे मिळून ३२.९ रुपयांचे विविध कर आकारले जातात. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख