पश्चिम बंगालमध्ये 3 मे रोजी भाजपचाच मुख्यमंत्री दिसेल; तेजस्वी सूर्यांचे भाकित

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना दिसत आहे.
in west bengal bjp chief minister on 3 may says tejasvi surya
in west bengal bjp chief minister on 3 may says tejasvi surya

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पहिला मुख्यमंत्री 3 मे रोजी विराजमान झालेला दिसेल. याचबरोबर राज्यातील विधानसभेच्या 294 पैकी 200 जागा जिंकून भाजप स्पष्ट बहुमत मिळवेल, असे भाकित भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी आज वर्तविले. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून, ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत 2016 मध्ये तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या, तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडून आले होते. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या वेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 18 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच  चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना तेजस्वी सूर्या म्हणाले की, राज्यात भाजपला दोनशेहून अधिक जागा मिळतील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे दिवस आता भरले आहेत. राज्यात 3 मे रोजी भाजपचा मुख्यमंत्री दिसेल. ममतांनी डाव्यांचाच वारसा पुढे चालवला आहे. पण भाजपचा मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात आणखी रक्तपात आणि राजकीय हत्या होणार नाहीत. 

भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी पाच वर्षांपासूनच सुरू केली होती. त्यामुळे आमच्या दोनशेपेक्षा अधिक जागा निवडून येतील.  आम्ही टप्प्याटप्प्याने वाटचाल करीत होतो. आमचा मंत्र '19 मे हाफ, 21 मे साफ' (2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात 48 पैकी 18 जागा मिळाल्या होत्या) हा आहे. 

निवडणूक आयोगाने २६ फेब्रुवारीला पश्‍चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या विधानसभा कार्यक्रमाची घोषणा केली. पश्‍चिम बंगालमध्ये २७ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. याला विरोध करीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना लक्ष्य केले होते. 

पश्चिम बंगाल निवडणूक कार्यक्रम : 
मतदान :
पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा  29 एप्रिल 

मतमोजणी : 2 मे 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com