देश विकणारे मोदी सरकार सत्तेतून जात नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील! - We will keep fighting till the people who are selling this country are out of power says Dola Sen | Politics Marathi News - Sarkarnama

देश विकणारे मोदी सरकार सत्तेतून जात नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील!

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कृषी विधेयकांवरुन देशात वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. आता निलंबित आठ खासदारांचा मुद्दा गाजू लागला असून, विरोधकांनी अधिवेशनावर बहिष्कार घातला आहे. 
 

नवी दिल्ली : कृषी विधयेकांवरुन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष मैदानात उतरले आहेत. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या आठ सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. यावरुन देश पातळीवर गदारोळ सुरू आहे. आता विरोधकांनी अधिवेशनावर बहिष्कार घातला आहे. निलंबित खासदार व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या डोला सेन यांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले आहे. सरकारविरोधात आता विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. 

कृषी विधेयकांवर आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांनी पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. या निर्णयानंतर आठही निलंबित सदस्यांनी कालपासून सुरू असलेले धरणे आंदोलन मागे घेतले. निलंबित केलेल्या आठ राज्यसभा सदस्यांना पाठिंबा म्हणून आणि या दोन्ही वादग्रस्त विधेयकांबाबतच्या हमी भावासह तीन मागण्या सरकार मान्य करत नाही तोपर्यंत हा बहिष्कार सुरू राहील, असे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.  

राज्यसभेत कृषी विधेयके मांडताना २० सप्टेंबरला झालेल्या गोंधळाबद्दल सभापती वेंकय्या नायडू यांनी डेरेक ओ ब्रायन, डोला सेन,  राजीव सातव, रिपुन बोरा, नासिर हुसैन, संजय सिंह, के.के. रागेश, के ई. करीम या अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित केले आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद आवारातच धरणे धरले होते. निलंबित खासदारांनी कालची रात्री संसद भवनातच घालवली होती. अखेर सभागृहातील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी धरणे मागे घेतले. 

पीठासीन अधिकाऱ्यांचा कल निलंबन मागे घेण्याकडे नाही हे लक्षात येताच काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी सभात्याग अस्त्र उगारले. समाजवादी पक्ष (सपा), राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी), द्रमुक, तृणमूल काँग्रेस (टीएमसी), आम आदमी पक्ष (आप), माकप आणि भाकप, राष्ट्रीय जनता दल, टीआरएस आणि बसप या पक्षांनी बहिष्काराचा सहभागी होण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकल्यानंतर जेमतेम तीन तासांमध्ये चार विधेयके मंजूर करून घेतली. 

डोला सेन यांनी सरकारविरोधातील हल्लाबोल आजही कायम ठेवला. त्या म्हणाल्या की, देश, शेतकरी, कामगार आणि मानवतेसाठी आमचा लढा सुरू आहे. हे देश विकणारे सरकार असून, ते जोपर्यंत सत्तेतून जात नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. निलंबन हा काही मोठा मुद्दा नाही. आता सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असून, आम्ही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख