होय, दिल्लीतील डॉक्टरांची ट्रिटमेंट घेऊन आम्ही सभागृहात उभे आहोत; पायलट यांची कबुली

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांचे मनोमिलन झाले आहे. आता विधानसभेचे बहुचर्चित अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पायलट यांनी स्वपक्षासोबत आणि भाजपलाही फटकारले आहे.
we are standing here after taking treatment from delhi doctor Says sachin pilot
we are standing here after taking treatment from delhi doctor Says sachin pilot

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड शमले असून, काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, पायलट हे सभागृहात आज उपस्थित होते. मात्र, पायलट यांची जागा बदलण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. खुद्द पायलट यांनीच यावर टिप्पणी केली आहे. याचबरोबर भाजपवर आज त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 

पायलट यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची 9 ऑगस्टला भेट घेतली होती. यानंतर 10 ऑगस्टला त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यांना तातडीने भेटीची वेळ देण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत राहुल यांच्यासोबत प्रियांका गांधी याही होत्या. या दोन्ही नेत्यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि के.सी.वेणुगोपाल यांच्या संपर्कात पायलट कायम होते. पायलट यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. ते पक्षात परत आले आहेत. 

पायलट यांचे समर्थक आमदार आता पुन्हा काँग्रेसच्या गोटात परतले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी पायलट यांना दिले आहे. मात्र, याचवेळी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी गेहलोत यांच्या पारड्यात मत टाकण्याची अट पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांना घालण्यात आली आहे. गेहलोत यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावल्यानंतर पायलट हे हरियानात गेले होते. तब्बल महिन्यानंतर पुन्हा राजस्थानमध्ये ते दाखल झाले आहेत. जयपूरमधील निवासस्थानी समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत झाले होते. 

राज्यातील काँग्रेसमधील बंड अखेर शमल्याने पक्षात आनंदाचे वातावरण आहे. बंडखोर आमदारही आता परतले आहेत. काँग्रेसचे सर्व आमदार आता हॉटेल फेअरमाँट येथे ठेवण्यात आले आहेत. याबद्दल पत्रकारांशी बोलताना गेहलोत म्हणाले की, विश्वासघात झाल्यानंतर मी नाराज झालो होतो. परंतु, शेवटी प्रत्येकाला पुढे जावे लागते. मी सगळे विसरून गेलो असून सर्वांना माफ केले आहे. 

पायलट आणि यांचे मनोमिलन अखेर झाले असून, गेहलोत सरकारमोरील संकट संपले आहे. गेहलोत आणि पायलट यांचे हस्तांदोलन आणि गळामिठ्या पाहता दोघांमधील संघर्ष संपला असेच चित्र होते. पायलट आज विधानसभा अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आले. मात्र, त्यांची जागाच बदललेली दिसली. आधीच्या जागेपासून आताची त्यांची जागा सभागृहात अगदी विरुद्ध बाजूला आहे. त्यांना विरोधी पक्षांच्या बाजूची जागा देण्यात आली आहे. यावरील आश्चर्य स्वत: पायलटही लपवू शकले नाहीत. मात्र, आजच्या सभागृहातील बसण्याच्या जागेवरुन अजूनही धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. 

काँग्रेस सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडला आहे. यावर बोलताना पायलट यांनी दिल्लीत गांधी कुटुंबीयांशी झालेल्या बैठकांचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, मी किंवा माझे मित्र असोत आम्ही डॉक्टरांना भेटलो आहोत. उपचार घेऊन झाल्यानंतर आम्ही सर्व 125 जण एकत्रितपणे सभागृहात उभे आहोत. सीमेवर तोफगोळ्यांचा मारा होत असतो मात्र, आमचे संरक्षक कवच सगळ्यांना सुरक्षित ठेवेल. 

भाजप नेते सतीश पूनिया यांनी माझ्याबद्दल टिप्पणी केली होती. त्यांना मला सांगायचे आहे की, मी, माझ्या कामाची पद्धती, माझे काम, माझे सहकारी आणि पक्षात आम्ही काय चर्चा करतो या बाबी आम्ही पाहून घेऊ. आज सभागृहात विश्वासदर्शक ठराव सुरू असून, मला कोणाचेही भाषण मध्येच रोखायचे नाही. कोणाच्या विधानाने मला दु:ख झाले असेल तर हा विषय मी पाहीन. आपण इथे सरकारसमोर असलेल्या विषयांवर बोलूयात, अशा शब्दांत पायलट यांनी भाजपला फटकारले. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com