राष्ट्रीय राजकारणात तावडेंचा दबदबा वाढणार; पक्षानं सोपवली मोठी जबाबदारी

विनोद तावडे पक्षात नाराज असल्याची चर्चा होती.
Vinod Tawde
Vinod TawdeSarkarnama

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून नाराज असलेले भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांना पक्षानं राष्ट्रीय संघटनेत बढती दिली आहे. सध्या राष्ट्रीय सचिव व हरयाणाचे प्रभारी असलेल्या तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील महिन्यांतच राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर काही दिवसांतच कार्यकारिणी तावडे यांच्यासह पाच जणांना बढती देत पक्षानं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत तावडे यांना तिकीट देण्यात आलं नाही. तेव्हापासून ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांना राज्याच्या कार्यकारिणीपासूनही दूर ठेवण्यात आलं आहे. मागील वर्षी त्यांच्याकडे हरयाणाचे प्रभारीपद व राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण त्यानंतरही त्यांची नाराजी दूर झाली नसल्याची चर्चा राजकीय वर्तूळात होती.

Vinod Tawde
मंत्रिमंडळ विस्तारावर पायलट यांच्याकडून काँग्रेसला टोला; म्हणाले...

राज्याच्या राजकारणापासून सध्या कोसो दूर असलेले तावडे यांना आता पक्षानं राष्ट्रीय राजकारणातच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे आजच्या नियुक्तीवरून स्पष्ट झाले आहे. तावडे यांची सचिव पदावरून सरचिटणीस पदी बढती करण्यात आल्यानं त्यांचा राष्ट्रीय स्तरावरील दबदबा वाढणार आहे. पंतप्रधानांच्या मन की बात चे समन्वयक, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे समन्वयक या जबाबदाऱ्याही त्यांच्याकडे आहेत.

तावडे यांच्यासह पाच जणांच्या नावांची राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांनी घोषणा केली आहे. बिहारमधील ऋतुराज सिन्हा व झारखंड येथील आशा लाकडा यांना सचिव, तर पश्चिम बंगालमधील भारती घोष व शहजाद पूनावाला यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Vinod Tawde
सरकारी कंपनीचं दातृत्व; मुलीच्या उपचारासाठी कर्मचाऱ्याला दिले तब्बल सोळा कोटी

भारतीय जनता पक्षाने पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखालील नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा घटस्थापनेच्या मुहूर्तावर केली होती. ३०९ जणांच्या या जम्बो टीम नड्डा-२ मध्ये राज्यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मंगलप्रभात लोढा (मुंबई) तसेच विनोद तावडे, पंकजा मुंडे, डॉ. हीना गावित यांच्याबरोबरच माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार विनय सहस्त्रबुध्दे, सुनील देवधर, अल्पसंख्यांक आघाडीचे जमाल सिद्दीकी यांंची नावे या यादीत आहेत. आशिष शेलार, चित्रा वाघ व सुधीर मनुगंटीवार यांना विशेष आमंत्रित म्हणून कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. मात्र केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com