अन् नायडू म्हणाले, सातव येथे 'स्पीकर' नसतात 'चेअरमन' असतात!

संसदेच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. राज्यसभेच्या कामकाजात आज काही विनोदी किस्सेही घडले.
vice president venkaiah naidu corrects congress leader rajeev satav
vice president venkaiah naidu corrects congress leader rajeev satav

नवी दिल्ली  : राज्यसभेत आज काँग्रेस नेते राजीव सातव यांनी 'माननीय स्पीकर' असे संबोधन वापरले. यावर सभापती वेंकय्या नायडू यांनी सातव यांना सुनावले. तुम्ही आता राज्यसभेत आला आहात. येथे 'स्पीकर' नसतात तर 'चेअरमन' असतात. यापुढे चेअरमन असेच संबोधन वापरा, असे  नायडू यांनी बजावले. हजरजबाबी असलेल्या नायडू यांनी दुसऱ्या एका काँग्रेस सदस्याला त्याची पदावनती झाली असल्याचे सांगितल्यानंतर मोठा हास्यकल्लोळ उडाला. 

छत्तीसगडमधील काँग्रेस खासदार छाया वर्मा यांचे नाव पुकारल्यावर वर्मा यांनी, मी राज्यसभेची सदस्या आहे. मात्र, लोकसभेतून बोलत आहे, असे सांगितले. यावर नायडू म्हणाले की, सदस्यांना दोन्ही सभागृहांत बसण्याची परवानगी मी दिली आहे. तुमची पदावनती म्हणजे कनिष्ठ सभागृहात तुम्हाला पाठवण्याचा निर्णय गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा व जयराम रमेश यांनी घेतला आहे. त्याला मी जबाबदार नाही. त्यांच्या या टिप्पणीवर हशा पिकला. 

दरम्यान, मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीचे जोरदार पडसाद आज राज्यसभेत उमटले. खासदार संभाजीराजे आणि काँग्रेसचे राजीव सातव यांनी शून्य प्रहरात या मुद्द्याकडे लक्ष वेधले. ज्येष्ठ नेते शरद पवार व अन्य सदस्यांनी सातव यांनी मांडलेल्या या मुद्याशी स्वतःला संलग्न केले. या मुद्द्यावरील घटनापीठासमोरील सुनावणीत केंद्र सरकारनेही राज्य सरकारसोबत बाजू मांडावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. 

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी आणि यावरील घटनापीठासमोरील सुनावणीत केंद्र सरकारनेही भाग घेऊन राज्य सरकारच्या बरोबरीने बाजू मांडावी, अशी मागणी सातव यांनी केली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. न्यायालयीन निकालामुळे मराठा समाजात तीव्र भावना आहेत. 

तमिळनाडू सरकारने 50 टक्‍क्‍यांची आरक्षण मर्यादा ओलांडून केलेले 69 टक्के आरक्षण गेली 26 वर्षे अंमलात आहे, याकडे संभाजीराजे यांनी लक्ष वेधले. मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती त्वरित उठवावी, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की, बहुतांश मराठा समाज आजही कष्टप्रद अवस्थेत जगत आहे. सरकारी नोकऱ्या आणि शैक्षिणक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली. नव्याने शिक्षण प्रवेश आणि नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

मोठ्या त्यागातून व संघर्षातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजातील अनेकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. राजर्षी शाहू छत्रपतींनी दिलेल्या आरक्षणात मराठा समाजचाही समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा अशी भूमिका मांडली होती,  असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com